आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jayakwadi Filled, But Aurangabadite Citizen Not Getting Appropriate Water

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जायकवाडी भरले तरी औंरगाबादकरांना दिवसाआड पाणी नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जायकवाडी धरण पूर्ण भरले तरीही औरंगाबाद शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य नाही, असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले. हर्सूल तलाव कोरडाच आहे. जायकवाडीतून पाणी आणण्याची जलवाहिन्यांची क्षमता नसल्याचे सांगताना समांतरची योजना पूर्ण झाल्यावर मात्र दररोज पाणीपुरवठा होऊ शकतो, असे स्वप्न दाखविण्यात आले.

2007 पर्यंत बन्सीलालनगर, वेदांतनगर रेल्वेस्टेशन, गुलमंडी, केळीबाजार, सिटी चौक, शहागंज आदी भागांत दररोज तर सिडकोमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. त्याबद्दल सर्वसाधारण सभेत चर्चा झाल्यावर संपूर्ण शहराला एक दिवसाआड पुरवठा करण्याचा निर्णय झाला. यामुळे तहानलेल्या वसाहतींना न्याय मिळेल, असे सांगण्यात आले होते. गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने जायकवाडीची पाणीपातळी घसरली. म्हणून दोन दिवसांआड पुरवठा सुरू झाला. पाऊस समाधानकारक झाल्यानंतर वेळापत्रक बदलण्याचे आश्वासनही देण्यात आले होते.

गेल्या दीड महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात सुमारे 18टक्के पाणी आले. मृतसाठा जिवंत झाला. शिवाय अँप्रोच कॅनॉलमुळे जेथून औरंगाबादसाठी उपसा केला जातो. त्या विहिंरीची पातळीही वाढली आहे. त्यामुळे एक दिवसाआड पुरवठा होण्याची शक्यता वर्तविली जात होती. या संदर्भात उपमहापौर संजय जोशी यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, सिंचन क्षेत्र वाढविण्यासोबत शहराला दररोज पाणीपुरवठा व्हावा, एवढी जायकवाडी धरणाची क्षमता आहेच. मात्र, वस्तुस्थिती विपरीत आहे. अँप्रोच कॅनॉलने उपसा विहिरींची पातळी वाढविली हे खरे असले तरी दररोज पुरवठा करणारी यंत्रणा मनपाकडे नाही. त्यामुळे सध्यातरी दोन दिवसांआडचे वेळापत्रक बदलता येणार नाही. त्यासाठी पंपिंग क्षमता आणि पाणी वाहून आणण्यासाठी नवी जलवाहिनीच टाकावी लागेल.

कार्यकारी अभियंता एस. डी. पानझडे यांनीही उपमहापौरांच्या सुरात सूर मिसळला. मात्र, त्यांनी हर्सूलच्या तलावाचे कारण पुढे केले. ते म्हणाले की, या तलावातून महापालिका दररोज सहा ते सात एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाणी उपसा करत होती. तेथे आता अर्धा एमएलडीही पाणी नाही. त्यामुळे जायकवाडीवरच अवलंबून राहावे लागत आहे. तेथे सध्या मुबलक पाणी असले तरी समांतर जलवाहिनीची योजना कार्यान्वित झाल्यावरच शहराला दररोज आवश्यक असलेले 180 एमएलडी पाणी मिळू शकते. हर्सूलचा तलाव काठोकाठ भरला तर एक दिवसाआड पुरवठय़ाचा विचार करणे शक्य आहे.