औरंगाबाद- पैठण तालुक्यातील
आपेगाव, हिरडपुरी बंधा-यात जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी या परिसरातील शेतक-यांनी सोमवारी कडा कार्यालयासमोर "झोपा काढा' आंदोलन केले आहे. जवळपास दीडशे शेतकरी कडा ऑफिससमोर दिवसभर झोपले होते. पाणी सोडण्यासंदर्भात लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा जायकवाडी संघर्ष कृती समितीने घेतला आहे.
पैठण तालुक्यातील आपेगाव आणि हिरडपुरी हे दोन्ही बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणे अवघड बनले आहे. त्यामुळे या भागातील शेतक-यांनी पाणी सोडण्यासाठी कडा कार्यालयासमोर आडवे होऊन आंदोलन सुरू केले आहे. एक टीएमसी पाण्याची गरज आपेगाव आणि हिरडपुरी या दोन्ही बंधा-यांसाठी एक टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या भागातल्या जवळपास आठ ते दहा हजार हेक्टरला त्याचा फायदा होणार आहे. याबाबत माहिती देताना संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांनी सांगितले की, याबाबत एक आॅक्टोबर आणि 27 ऑक्टोबरला निवेदने देण्यात आली. 27 ऑक्टोबरला आंदोलन केल्यानंतर दोन दिवसांत पाणी सोडण्याचे नियोजन केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र तरीही पाणी सोडले नाही. त्यामुळे आता पाणी सोडणार नाही तोपर्यंत येथेच झोपून राहणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. कडा विभागाच्या वतीने अधीक्षक अभियंता एन. व्ही. शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. दरम्यान, बंधाऱ्यात पाणी सोडण्यासंदर्भात प्रकल्पात नियोजन नाही. त्यामुळे याबाबत शासनस्तरावर निर्णय घेतल्यानंतरच पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती गोदावरी पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी दिली. आंदोलकांची आमदार अतुल सावे तसेच गेवराईचे बदामराव पंडित यांनी भेट घेतली. या आंदोलनात ज्ञानेश्वर औटे, अच्युत औटे, महादेव गोर्डे, आजम पठाण, मकबूल पठाण, रामकिशन भावले, किशोर दसपुते, नीलेश दसपुते, सुभाष पठाण यांच्यासह दीडशे शेतकरी सहभागी झाले आहेत.
पिकांवर परिणाम
पाणी नसल्यामुळे पिके करपत असल्याचे आपेगाव येथील शेतकरी संभाजी काळे यांनी सांगितले. ते म्हणाले, माझी 25 एकर शेती आहे. पाण्यासाठी कर्ज काढून दहा हजार फूट पाइपलाइन टाकली. मात्र आता पाण्याअभावी उभी पिके तसेच मोसंबीच्या बागा सुकत आहेत. पाणी न मिळाल्यास लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. आपेगावच्या सचिन आवटे यांनी सांिगतले की, त्यांची दहा एकर जमीन आहे. त्यांनीही पाइपलाइन टाकली. मात्र पाणीच नसल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शासनाने पाणी सोडले तरच शेतक-यांवरचे संकट दूर होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केली