आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीचा साठा जिवंत, औरंगाबादकरांना दिलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आठ दिवसांपूर्वी मृत जलसाठ्यात गेला होता. दारणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे बुधवार रात्री जायकवाडीत पाणी जिवंत साठ्यात आले. सध्या दारणातून १२ हजार ४५४ क्युसेक वेगाने पाणी जायकवाडी धरणात दाखल होत आहे. जिवंत साठ्यात ५.५५२ दलघमीची वाढ झाली आहे. याच वेगाने पाण्याची आवक सुरू राहिली तर आणखी २४ तासांत जायकवाडीचा पाणीसाठा एक टक्क्यावर येईल, अशी माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

गेल्या महिनाभरात ‘दिव्य मराठी’ने विशेष अभियान राबवल्याने जायकवाडी धरणातून कृषी पंपांद्वारे होणारा दिवसभराचा उपसा दोन तासांवर आणला होता. त्यामुळे जायकवाडीचा मृत साठा ७३८ दलघमीवर होता. त्यातून २५ दलघमीहून अधिक पाणी उपसा झाल्याने मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली होती. ते पाणी पिण्यासाठी राखीव ठेवत उद्योग व पिण्याच्या पाण्यात कपात करण्यात आली होती. त्यात चार दिवसांत दारणातून ओव्हरफ्लोचे पाणी गोदावरीत सोडण्यात आले. दारणाचे पाणी तीन दिवसांनी जायकवाडीत दाखल होण्यास सुरुवात झाल्याने बुधवारी आठ दिवसांनी धरणाचा पाणी साठा जिवंत साठ्याच्या वर आला आहे.

सध्या मृत साठ्यात ५.५८ दलघमीची वाढ झाली असून आणखी २४ तासांत धरण १ टक्क्यावर येईल, असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला.

भंडारदराचे पाणी पळवले
भंडारदराचे पाणी थेट गोदावरीत पोहोचण्यापूर्वीच नगर जिल्ह्यात वळवल्याने जायकवाडीत केवळ दारणाचे पाणी ५ हजार ४५४ क्युसेक वेगाने दाखल होत आहे.

धरण क्षेत्रावर पाऊस नसल्याने बाष्पीभवन
धरणाचे पाणलोट क्षेत्र २१७५० चौ. कि. मी असून सध्या या परिसरात पाऊस नसल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण कमी झालेले नाही.

आता वीज केंद्र सुरू होणार
धरणाचा जलसाठा मृत साठ्यात आला तर धरणाच्या पायथ्याशी असणा-या १२ मेगावॅट वीजनिर्मिती करणा-या वीजगृहाला पाणी मिळत नाही. ते पाण्याअभावी आठ दिवसांपासून बंद होते. आता धरणाचा पाणी साठा जिवंत जलसाठ्यात आल्याने वीजनिर्मिती केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे.