आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुळा’तून विसर्ग; जायकवाडी ८१ टक्के भरले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नगर जिल्ह्यातील मुळा धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. रविवारी संध्याकाळी हे धरण ८१ टक्के भरले गेले. मुळामधून रविवारी सकाळी ४३०० क्युसेक, तर नांदूर-मधमेश्वरमधून १६१४ क्युसेक पाणी सोडले जात असल्यामुळे जायकवाडीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. रविवारी दिवसभरात जायकवाडीत अर्धा टीएमसी पाण्याची आवक झाली होती.
मराठवाड्यातल्या ११ मोठ्या प्रकल्पांत ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. येलदरी प्रकल्पात सर्वात कमी २५ टक्के इतका पाणीसाठा आहे. जायकवाडीच्या पाणीसाठ्यात मात्र सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत जायकवाडीत १५ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. मुळा धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. नाशिक आणि नगरमध्ये आणखी एखादा मोठा पाऊस झाल्यास विसर्गही मोठ्या प्रमाणात वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे जायकवाडीतील पाणीसाठा आपोआपच वाढेल.

सद्य:स्थिती अशी : जायकवाडीधरणात सध्या एकूण पाणीसाठा २४९२ दलघमी इतका आहे. उपयुक्त पाणीसाठा १७५४ दलघमी असून ८०.८१ टक्के पाणीसाठा आहे. रविवारी मुळातून ४३०० क्युसेक, दारणामधून ६०० आणि नांदूर-मधमेश्वर १६१४ क्युसेक विसर्ग सुरू होता. त्यामुळे जायकवाडीच्या साठ्यात वाढ होत आहे. जायकवाडी पाणलोट क्षेत्रातही पाऊस झाल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होईल.

किमान पाच पाणीपाळ्या मिळणार
जायकवाडीच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे रब्बी पिकांसाठी किमान पाच पाणीपाळ्या मिळू शकतील. यापूर्वी केवळ दोन पाळ्या देण्याचे नियोजन होते. मात्र खरिपाचे वाचलेले पाणी तसेच माजलगावसह इतर बंधाऱ्यात पाणी सोडण्याची आवश्यकता राहिली नाही. त्यातच जायकवाडीचा पाणीसाठा ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे रब्बीसाठी पाचपेक्षा अधिक पाणीपाळ्या मिळण्याची शक्यता आहे. १५ ऑक्टोबरला पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...