आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्तचे जेसीबी गायब, अधिकाऱ्यांची शोधाशोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - जलयुक्त शिवाराची कामे करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यासाठी दिलेले जेसीबी मशीन गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मशीन गेले कुठे याचा शोध प्रशासकीय यंत्रणा दोन दिवसांपासून घेत आहे. जबाबदार अधिकारी स्तरावर कुणालाही या गायब झालेल्या जेसीबीची माहिती देता आली नाही. याप्रकरणी टीम ‘दिव्य मराठी’ने पाठपुरावा करत सर्वत्र शोध घेतला असता सारोळा गावात दोन दिवसांपासून बेवारस तेच जेसीबी आढळले. याप्रकरणी दुष्काळात अधिकारी किती तत्पर आहेत याची प्रचिती येते.

दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवाराची जास्तीत जास्त कामे करण्यावर सरकारचा भर असून सर्व यंत्रणा कामाला लागल्याचे चित्र आहे. परंतु सिल्लोड तालुक्यात या कामांमध्ये प्रचंड गोंधळ व अनियमितता असल्याचे समोर आले आहे.पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाचे जेसीबी मशीन जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविले आहे. महिनाभर रहिमाबाद शिवारातील लघु पाटबंधारे विभागाच्या पाझर तलावातील गाळ काढल्यानंतर ते काम पाच ते सहा दिवसांपूर्वी बंद करण्यात आले. त्यानंतर सदरील मशीन कुठे गेले याचा प्रशासनाला पत्ताच नाही. शनिवारी खुल्लोडच्या गावकऱ्यांनी मशीनची मागणी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला.लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता सुतावणे यांचेकडे चौकशी केली असता आमच्या विभागांतर्गत काम संपल्यानंतरची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले व याचे नियंत्रण करणाऱ्या जलयुक्त शिवार तालुका समन्वय समितीकडे विचारणा करण्यास सांगितले. जलयुक्त शिवारतालुका समन्वय समितीचे सचिव तालुका कृषी अधिकारी सुभाष आघाव यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कानावर हात ठेवले.

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करून जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. या विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता रहिमाबाद येथील काम संपल्यानंतर चालकाचा आमच्याशी संपर्कच नसल्याचे ते म्हणाले. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसिंचनाची कामे हाती घेण्यात येत आहेत. परंतु बेजबाबदारपणामुळे शासनाने दिलेला निधी व यंत्रणा वाया जाण्याची शक्यता असल्याचे जेसीबी गायब प्रकरणावरून सिद्ध झाले आहे.
टीम दिव्य मराठीने लावला त्या जेसीबीचा शोध
जेसीबी मशीन गायब झाल्याचा हास्यास्पद प्रकार प्रशासकीय यंत्रणेत सुरू झाल्यानंतर मशीनचा शोघ घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने सूत्र फिरवून आपल्या यंत्रणेमार्फत शोध घेतला. जेसीबी सारोळा येथे उभे आहे. गावात काम करणारे तलाठी, ग्रामसेवक ,कृषी सहायक यांच्यासह शेकडो कर्मचारी हाताशी असणाऱ्या शासकीय यंत्रणेला दुष्काळाच्या काळात काम करण्यासाठी पाठविलेले एक जेसीबी सापडत नसल्याने यंत्रणेत समन्वयाचा गोंधळ व बेजबाबदारपणाच समोर आला.
- सिल्लोडचा चार्ज घेऊन मला चारच दिवस झाल्याने पूर्ण यंत्रणा व सुरू असलेल्या कामांसंदर्भात माझ्याकडे परिपूर्ण माहिती नाही. समन्वयाच्या अभावामुळे जेसीबीची माहिती मिळू शकली नसेल. सोमवारी कार्यालयीन वेळेत यासंदर्भात निश्चित माहिती देतो.
- विपिन इटनकर, उपविभागीय अधिकारी, सिल्लोड- सोयगाव
बातम्या आणखी आहेत...