आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई मेन्सचा निकाल जाहीर, कटऑफ आला खाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई मेन्सचा निकाल सोमवारी दुपारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यंदा पात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. परंतु जेईई अॅडव्हान्ससाठीचा कटऑफ खाली आला आहे. तसेच फिजिक्स विषयातील गुणवत्ताही घसरल्याचे दिसून आले.

सीबीएसईच्या वतीने देशभरातील नामांकित बीई, बीटेक आणि आर्किटेक्ट महाविद्यालयांतील प्रवेशासाठी ४ एप्रिल रोजी जेईई मेन्स घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी देशभरातून १३ लाख विद्यार्थी बसले होते. औरंगाबादमधून ८ हजार ६३० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. ऑनलाइन परीक्षा १० व ११ एप्रिल रोजी झाली. यंदा दोन स्तरावर हा निकाल घोषित झाला असून ऑल इंडिया रँक, स्टेट रँक आणि कॅटेगरी रॅँक ही ७ जुलै रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. यंदाच्या निकालात विद्यार्थ्यांचे पात्र होण्याचे प्रमाण चांगले अाहे. फिजिक्सचा पेपर अधिक अवघड काढला होता. केमिस्ट्री आणि मॅथस विषयात विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले, अशी माहिती नारायणा इन्स्टिट्यूटचे डॉ.एम.एफ.मल्लिक यांनी दिली. यंदाची ही देशपातळीवरील शेवटची परीक्षा असून पुढील वर्षीपासून राज्यस्तरावरील सीईटी होणार आहे. आजच्या निकालात दीड लाख विद्यार्थी अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेचा निकाल १८ जून रोजी जाहीर करण्यात येईल. त्यापूर्वी ८ जून रोजी नमुना उत्तरपत्रिका संकेतस्थळावर पाहता येणार आहे.