आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिन्सी बलात्कार प्रकरण: पीडितेच्या जबाबानंतर संगणक शिक्षकाच्या मुसक्या आवळल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिन्सीतील आठवर्षीय बलात्कार पीडित मुलीचा जबाब पोलिसांनी नोंदवला. त्यानंतर शाळेतील संगणक शिक्षकाला अटक करण्यात आली. काझी शमशोद्दीन (२८, रा. अालमगीर कॉलनी) असे मुसक्या आवळलेल्या संगणक शिक्षकाचे नाव आहे.

जिन्सी येथील सुप्रीम ग्लोबल स्कूलमधील ३८ वर्षांच्या शिक्षकाने एका आठ वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना २० दिवसांपूर्वी घडली होती. पहिल्या दिवशी पीडित मुलीच्या आजीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी तथा अरबी भाषेचा शिक्षक अहमद खान आमिर खान (३८, रा. मंजूरपुरा) याला अटक केली होती. दोन दिवसांनंतर या प्रकरणात तीन रिक्षाचालकांसह एका संगणक शिक्षकाचाही सहभाग असल्याचा नातेवाइकांनी आरोप केला होता. मात्र, मुलीचा जबाब नोंदवला गेल्याने पोलिसांचा पुढचा तपास रखडला होता. हे प्रकरण दडपण्याबाबत आमच्यावर दबाव आणला जात असल्याचे पीडित कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

संघटनांनी केली आंदोलने
पीडितमुलीचा जबाब नोंदवला नसल्यामुळे पोलिसांना कारवाई करणे अवघड जात होते. घडलेल्या प्रकाराची तपासणी होऊन आरोपींना अटक व्हावी याकरिता 'दिव्य मराठी’ने पाठपुरावा केला. दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांनीदेखील याप्रकरणी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. अनेक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी पोलिस अधिकारी, समाजसेवक, डॉक्टर यांचे मिळून एक पथक तयार करून पीडितेचा जबाब नोंदवला. ज्या तीन रिक्षाचालकांवर आरोप करण्यात आले, त्यांचीदेखील चौकशी करण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण पाटील यांनी दिली.

विशेष पथकच झाले पीडितेचे नातेवाईक
अवघ्या आठ वर्षांच्या वयात या चिमुकलीला नरकयातना सोसाव्या लागल्या. शिवाय आईवडिलांना मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने पीडित मुलगी मानसिक धक्क्यात होती. अखेर पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर पोलिस निरीक्षक किरण पाटील यांच्यासह मंगला खिंवसरा, डॉ. मोनाली देशपांडे यांच्या पथकाने या मुलीचा जबाब नोंदवला. आपल्यावर बेतलेला प्रसंग या चिमुकलीला व्यक्त करणेही अवघड जात होते. या विशेष पथकाने या मुलीच्या घरी जाऊन जबाब नोंदवला. शाळेच्या गच्चीवर नेऊन आपल्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने समितीला सांगितले. पीडित मुलीच्या मनावर आघात होऊ नये याची विशेष काळजी घेत नातेवाइकांप्रमाणे या पथकातील सदस्यांनी तिची विचारपूस करून जबाब नोंदवला.
बातम्या आणखी आहेत...