औरंगाबाद - चिकलठाणा विमानतळावर बुधवारी सायंकाळी अनर्थ टळला. जेट एअरवेजचे विमान धावपट्टीवर उतरताना डाव्या बाजूला झुकले होते. त्यामुळे प्रवासी घाबरले. मात्र, वैमानिकांनी प्रसंगावधान बाळगत नियंत्रण राखल्याने 62 प्रवासी बालंबाल बचावले.
जेट एअरवेजची मुंबई-औरंगाबाद आणि औरंगाबाद-मुंबई अशी सेवा आहे. बुधवारी सायंकाळी मुंबईहून 5.40 वाजता निघणारे विमान खराब हवामानामुळे 6.20 वाजता निघाले. औरंगाबादपर्यंत वातावरण खराबच होते. वादळी वार्याचे धक्के जाणवत होते. ताशी 500 कि.मी. वेगाने ते 7.30 वाजता धावपट्टीवर लँड झाले. तेव्हा बारीकसा धक्का बसला. त्यातून प्रवासी सावरत नाहीत तोच अचानक 12 ते 15 सेकंद ते डाव्या बाजूला झुकले. यामुळे काही जण ओरडले. पण वैमानिकांनी नियंत्रण आणत सुरक्षित लँडिंग केले. विमानातून महसूल राज्यमंत्री सुरेश धस, आमदार अब्दुल सत्तार, सिडकोचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, सहव्यवस्थापकीय संचालक व्ही. राधा, मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सर्वदे, मुख्य नियोजनकार एम. डी. लेले, प्रख्यात स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. कानन येळीकर, उद्योजक डॉ. उल्हास गवळी होते.
तपासणीनंतर रवाना
मात्र, या विमानाची दीड तास कसून तपासणी करण्यात आली. आसन व्यवस्था, दरवाजे, कॉकपिट, पंखे, पेट्रोलची टाकी आदींची तज्ज्ञांनी पाहणी केली. त्यांनी सर्वकाही ठीकठाक असल्याचा निर्वाळा दिल्यावर विमान मुंबईकडे रवाना झाले. तेथे सुरक्षित लँडिंग झाले.
औरंगाबादच्या खड्डय़ांचा अनुभव
घटना खराब हवामानामुळे झाली असावी, पण वैमानिकांनी कौशल्याने स्थिती हाताळली. मूळात मुंबईपासूनच हादरे जाणवत होते. विमान प्रवासात प्रथमच औरंगाबादच्या खड्ड्यांसारखा अनुभव आला.
डॉ. उल्हास गवळी, उद्योजक
वैमानिकाचा हलगर्जीपणा
घटनेला वैमानिकच जबाबदार आहे. हलगर्जीपणाचा हा प्रकार असून, त्याची चौकशी व्हावी.
-अब्दुल सत्तार, आमदार
वैमानिक नशेत असावा
भयानक! उतरताना एखाद्या इंचावरून वाचलोत. दोन इंच जर विमान खाली घसरलं असतं, तर मोठा स्फोट झाला नसता. लॅँड होण्यापूर्वी हवेतच विमानाने हेलकावे खाण्याचा प्रयत्न केला. बहुतेक वैमानिक दारू प्यायलेला असावा. डावीकडून-उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे, असे पाच सहा वेळा वळणे घेऊनही विमान धावपट्टीवर आलं. आमच्यासह अन्य प्रवाशांनीही ई-मेलद्वारे तक्रार केली आहे.
सुरेश धस, राज्यमंत्री
राज्यमंत्र्यांनी केली तक्रार
विमानतळावर उतरल्यानंतर प्रवासी राज्यमंत्री सुरेश धस, आमदार अब्दुल सत्तार यांनी विमान प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवत चौकशीची मागणी केली. त्यावर प्राधिकरणाने काय निर्णय घेतला, हे रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही.
खराब हवामानाचा दोष
सुदैवाने अपघात टळला. मात्र, यात वैमानिकाचा दोष नाही. खराब हवामानामुळे हा प्रकार होतो. त्याला हार्ड लँडिंग म्हणतात, असे जेटच्या एका अधिकार्याने सांगितले.
वैमानिकांनी प्रसंगावधान राखत विमानावर नियंत्रण मिळवले व धावपट्टीवर स्थिर केले.