आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeweller Thakkar Murdered After Looting 35 Lack Rupees

35 लाखांचा ऐवज लुटून सराफ शैलेश ठक्कर यांची हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वैजापूरहून बेपत्ता झालेले सराफा व्यापारी शैलेश भरतकुमार ठक्कर-चंद्राणी (35, औरंगाबाद) यांची हत्या झाल्याचे बुधवारी रात्री स्पष्ट झाले. प्रवरासंगम येथील गोदावरी नदीपात्रात पोत्यात बांधलेला त्यांचा मृतदेह सापडला. येवला तालुक्यातील उंदीरवाडी परिसरात बुधवारीच त्यांची हत्या झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. या हत्येच्या निषेधार्थ औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे पाच हजार सराफा व्यापा-यांनी गुरुवारी कडकडीत बंद पाळला.
शैलेश यांचे कासारी बाजारात स्वामी नारायण ज्वेलर्स हे दुकान आहे. 9 नोव्हेंबरला सकाळी दीड किलो सोने घेऊन ते रेल्वेने लासूरला गेले. काही वेळ थांबून ते वैजापूरला रवाना झाले. दुपारी 3च्या सुमारास त्यांनी मोबाइलवर घरी संपर्क साधला होता. वैजापुरात व्यापा-यांना भेटून साडेचारला येवल्याकडे निघालेले शैलेश तेथे पोहोचलेच नाहीत. उंदीरवाडीजवळ गाठून गुंडांनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोकड असा 35 लाख रुपयांचा ऐवज लुटून हत्या केली. नंतर मृतदेह पोत्यात घालून गोदावरी नदीत टाकला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
तीन मृतदेह सापडले... एक होता पोत्यात
बुधवारी नेवासा पोलिसांना गोदावरी नदीच्या पात्रात तीन मृतदेह सापडले. त्यापैकी एक मृतदेह कमरेला दगड बांधून पोत्यात बांधलेला होता. ओळख पटवण्यासाठी वैजापूर पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली. मृतदेह शैलेश यांचाच असल्याचा संशय आल्याने रात्री शैलेश यांचे बंधू आशिष ठक्कर यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधला. बोटातील अंगठी, गळ्यातील चेन आणि मोरपंखी टी शर्टवरून खात्री पटली आणि त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. शैलेश यांच्या पार्थिवावर कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोबाइल लोकेशनवरून शोध
शैलेश बेपत्ता असल्याचे कळताच सराफा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक वारेगावकर यांनी पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांची भेट घेतली. पोलिसांनी मोबाइलचे लोकेशन घेतले तेव्हा त्यांचे शेवटचे लोकेशन उंदीरवाडी गावाजवळ सापडले. बुधवारी 5 वाजून 33 मिनिटांनी त्यांनी शेवटचा कॉल केला होता. नंतर मात्र त्यांचा मोबाइल बंद झाला.
पिस्तूलचे परवाने द्या : सराफा व्यापा-यांना स्वरक्षणासाठी पिस्तूलचे परवाने द्यावेत, अशी मागणी सराफा व्यापा-यांनी केली आहे. यापूर्वीच 20 व्यापा-यांनी पिस्तूलसाठी अर्ज केले आहेत; परंतु केवळ चौघांनाच परवाना मिळाला. अटी शिथिल करून हे परवाने देण्यात यावेत, अशी मागणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा यांनी केली.