आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jewellery Shop Owner Attack On Wife In Aurangabad

संशयखोर व्यापार्‍याकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका व्यापार्‍याने तिच्या डोक्यात भला मोठा पाना मारून थेट पोलिस ठाणे गाठले. ही भयंकर घटना सोमवारी पहाटे कासारी बाजारात घडली. सुनील नावाच्या व्यापार्‍याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या गंभीर जखमी पत्नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वडिलोपाजिर्त सोने विक्रीचा व्यवसाय असलेल्या सुनीलचे कासारी बाजार येथे तीनमजली घर आहे. वडिलांच्या निधनानंतर अनेक वर्षांपासून त्याने सराफ्यातील दुकानालाही टाळे ठोकले होते. सुनीलचा विवाह 27 वर्षांपूर्वी झाला. त्यांना अपत्य नाही. मूल होत नसल्यामुळे सतत निराश राहणारा सुनील आपल्या 42 वर्षीय पत्नीवर संशय घेत होता. तो सातत्याने भांडण उकरून काढून पत्नीला त्रास देत असे. 18 नोव्हेंबरला पहाटे चार वाजता पत्नीच्या डोक्यात (24-27 चा) रिंग पाना घातला. त्यानंतर 45 मिनिटे तो घरी थांबला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडताच त्याने 4.45 वाजता सिटी चौक पोलिस ठाणे गाठले. त्या वेळी उपस्थित पोलिस कर्मचार्‍यांना खून केल्याची कबुली देऊन आपल्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्याने स्वत:च केली.

14 नोव्हेंबरला पडली ठिणगी!
सुनीलचा एक 61 वर्षीय मित्र त्याला भेटण्यासाठी 14 नोव्हेंबर रोजी दुपारी घरी आला होता. पती घरी नसल्यामुळे पत्नीने त्यांना काही वेळ वाट बघण्यास सांगितले. काही क्षणांत सुनील घरी परतला आणि मित्राला घरी बघून त्याच्या संशयात आणखीच भर पडली. याच कारणाने पत्नीशी तो चार दिवसांपासून सतत भांडत होता. घर सोडून जातो म्हणून त्याने नागपूर गाठले. मित्रांनी समजूत घालून संशयखोर वृत्ती सोडण्याचा सल्ला देत त्याला 16 नोव्हेंबरला घरी परतण्यास बाध्य केले. त्यानंतर 17 नोव्हेंबरला तो रात्रभर पत्नीशी भांडत होता. त्यानंतर पहाटे तीन ते चारच्या दरम्यान घरातील रिंग पान्याने डोक्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा समज झाल्याने त्याने सिटी चौक पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याचे घर गाठून पत्नीला उपचारांसाठी दाखल केले. पंचनाम्यानंतर त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वत:च फिर्यादी अन् आरोपी
फौजदारी गुन्हे संहितेच्या (सीआरपीसी) कलम 154 नुसार पाच जण फिर्याद देण्यासाठी पात्र आहेत. पीडित व्यक्ती, साक्षीदार, जबाबातील खरेपणाची खात्री स्वीकारणारी व्यक्ती, पोलिस अधिकारी अथवा कर्मचारी आणि आरोपी स्वत:च तक्रार देण्यासाठीही पात्र आहे. त्यानुसार या घटनेत सुनीलने स्वत:च फिर्याद दिलेली आहे.