आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिजाऊ सृष्टीच्या विकासासाठी 11 हजार कोटींचा प्रकल्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीच्या 450 एकर जागेवर अद्ययावत संग्रहालय, ग्रंथालय, महिला रोजगार केंद्र, महिला मिलिटरी अकॅडमी, सिंधू संशोधन संस्था, महिला विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्राची उभारणी करण्यासाठी 11 हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. सृष्टीची नोंद जगातील सात आश्चर्यात व्हावी या उद्देशाने प्रयत्न सुरू असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष शिरीष शंकरराव जाधव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिजाऊ सृष्टीचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी लोकसहभागातून निधी गोळा केला जाणार आहे. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला होता. त्या केवळ शिवबांच्याच आई नव्हत्या तर त्या राष्ट्रमाता होत्या, पण त्यांचे देशात एकही स्मारक नाही, अशी खंत जाधव यांनी व्यक्त केली. जिजाऊंच्या जन्मस्थळी लखुजीराजांचा वाडा, रंगमहाल, सावकार वाडा, कालकोट, लखुजीराजांचे समाधिस्थळ, पुतळा, बारव, सजना तलाव, गंगासागर, क ाळसमुद्र या नावाची विहीर, चांदणी तलाव, मोती तलाव अशी ऐतिहासिक स्थळे आहेत. संशोधनकर्त्यांना या पुरातन वास्तूंचा व तलावांचा अभ्यास करता यावा म्हणून येथे विकास करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पर्यटकांनी या ठिकाणी आकर्षित व्हावे म्हणून विविध योजना राबवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. विकासासाठी दानशूर व्यक्तींच्या आर्थिक पाठबळाची गरज असून सर्वांनी या ठिकाणाला जागतिक पातळीवर वैभव मिळवून देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जाधव यांनी केले. पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष कामाजी पवार, वासंतीताई नलावडे, अविनाश कोठाळे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनसोडे, प्रा. प्रदीप साळुंके, अरविंद तनपुरे आदींची उपस्थिती होती.

कला, साहित्य, क्रीडा क्षेत्रापासून मराठा समाज वंचित
मराठा समाजातील मुले-मुली कला, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रापासून वंचित आहेत. त्यांच्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे, पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. आर्थिक मदत मिळत नाही. या क्षेत्रात कसे यावे, याचे ज्ञान नाही त्यामुळे ते वंचित राहत आहेत. त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी 32 कक्षातून कार्यक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या कक्षातून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण का हवे? या मागणीसाठी वस्तुनिष्ठ सर्वेक्षण केले जात आहे. त्याचा अहवाल तयार करून तो राणे समितीसमोर सादर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

असा होणार विकास
जिजाऊ धर्मपीठ, मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. अद्ययावत तीर्थक्षेत्र व ज्ञानक्षेत्र, महिला मिलिटरी अकॅडमी, सिंधू संशोधन संस्था, महिला विद्यापीठ, ध्यानमंदिर, संशोधन विभाग, प्रार्थनास्थळांची रचना करण्यात येणार आहे. तसेच एकसंधतेसाठी विविध चर्चासत्रांचे आयोजन, विविध विषयांचे प्रशिक्षण, फ रकमांडो फोर्स ट्रेनिंग सेंटर, केडर कॅम्प, मिशन ऑलिम्पिक यासारख्या विविध योजना सुरू करण्यात येणार आहेत. जिजाऊ काळातील स्थिती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाचे प्रसंग ते आजपर्यंतची देशाची वाटचाल, समाजसुधारक, संतांची शिकवण, चित्ररूपाने, शिल्परूपाने साकारण्यात येणार आहे.