आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिकठाण आरोग्य केंद्रात पाण्याचा ठणठणाट !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र जिकठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व सुविधा असूनही केवळ पाणी नसल्याने प्रसूती होत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे रुग्णांना थेट गंगापूर येथील ग्रामीण रुग्णालयात धाव घ्यावी लागते.
माता मृत्युदर आणि अर्भक मृत्युदर कमी करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी प्रसूती दवाखान्यात, आरोग्य संस्थेत अथवा शासनाच्या आरोग्य केंद्रातच करण्यासाठी शासकीय पातळीवर विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्यात जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा अशा योजनांचा समावेश आहे. तसेच प्रत्येक गावातील गरोदर मातांना प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यासाठी आशा कार्यकर्तींची निवड करण्यात आली असून त्यांना त्यासाठी मानधनही देण्यात येते. पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी रुग्णांकडून पाठ फिरवण्यात येत होती. ही परिस्थिती शासनाच्या योजना आणि इतर सुविधांमुळे बदलली असून रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र रुग्णालयात केवळ पाणी नसल्यामुळे रुग्णांना 20 किलोमीटरचा प्रवास करत जीव धोक्यात घालून गंगापूर गाठावे लागत असल्याचेही समोर आले आहे.