आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीही सुटाबुटात, व्हर्च्युअल क्लास अन् बोलक्या भिंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी तसूभरही कमी पडू नये. त्यासाठी शिक्षकांनी कंबर कसल्याने बहुतांश शाळांचा चेहरामोहरा बदलला आहे. आता शाळेचे विद्यार्थी व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे घेत आहेत. त्यानुसार उंबरखेड तांडा येथील विद्यार्थी लवकरच व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून शिक्षण घेणार आहेत. त्यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी सुरू केली. विशेषत: या शाळांचे विद्यार्थी 15 ऑगस्टपासून सुटाबुटात दिसत आहे.

कन्नड तालुक्यातील बहुतांश शाळांचा परिसरही प्रफुल्लित करण्यावरही शिक्षकांसह ग्रामस्थ भर देत आहेत. अनेक ठिकाणी शाळेच्या सर्वच भिंती रंगवल्याने त्या बोलक्या झाल्या असून त्यावरील चित्रे घोषवाक्य, पाढ्यांची आणि सामान्यज्ञानाची माहिती वाचण्यासाठी विद्यार्थी आकर्षित होताना पाहावयास मिळत आहे.

शाळेचा परिसर वृक्षारोपण केल्याने हिरवागार झाला आहे. शिक्षक गुणवत्तेकडे लक्ष देत असल्याने ग्रामस्थही विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जमेल त्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. याच लोकांच्या सहभागातून अनेक शाळांत व्हर्च्युअल क्लास उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना संगणक ज्ञानाची ओळख होऊ लागली आहे. त्यामुळे शाळेतील उपस्थिती वाढली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाणही कमी झाले आहे. विद्यार्थ्यांना क्लिष्ट वाटणारे विषय सहज आणि सोपे जात आहेत. ग्रामीण भागातही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षणाची गंगा वाहत असून शिक्षक इंटरनेट, सोशल मीडियाचा उपयोगही अध्यापनासाठी करत आहेत.

ग्रामस्थांनी दिले बूट, टाय अन् सॉक्स
उंबरखेडतांडा येथील विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळताच गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना बूट, टाय, सॉक्स वर्गणी जमा करून दिले, तर व्हर्च्युअल क्लासरूमसाठीही निधी जमा करणे सुरू केले आहे. आपल्या गावातील विद्यार्थीही कमी पडू नये, यासाठी ग्रामस्थ स्वत:हून सहभागी होत आहेत. सढळ हाताने वर्गणी जमा करत आहे. सरपंच दादा पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य चंदरसिंग हुकूमदार, बापू पवार, विनोद पवार, शंकर पवार, गोविंद पवार, ममराज पवार हे स्वतः वर्गणी जमा करत आहे.

सद्य:स्थितीत तालुक्यात लोकवर्गणीतून शिक्षक-पालक-ग्रामस्थ यांच्या समन्वयातून जवळपास शंभर व्हर्च्युअल क्लासरूम सुरू झाले आहे. लवकरच उंबरखेडा (तांडा) येथील जि.प.प्रा.शाळाही व्हर्च्युअल करणार आहोत.
-अमृत बिरारीस, मुख्याध्यापक

जिल्ह्यात पहिली व्हर्च्युअल क्लासरूम ही अमृत बिरारीस यांच्या प्रयत्नाने ग्रामस्थांच्या सहभागातून चिंचखेडा येथे तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या हस्ते उद््घाटन करून सुरू करण्यात आली आहे.

शैक्षणिक दर्जा वाढीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. गणिताचा पाया भक्कम होण्यासाठी, गणित विषयाची रुची वाढवण्यासाठी संगीत, पाढे, सुंदर हस्ताक्षर, दृक््श्राव्य साधनांच्या साहाय्याने मराठी, हिंदी, इंग्रजीचे अध्यापन, खडू फळा यांच्या संगतीला प्रोजेक्टरच्या साहाय्याने गणित, विज्ञान विषयांचे अध्यापन करण्यात येत आहे. विद्यार्थी स्पर्धेच्या युगात कुठेही कमी पडू नये, आत्मविश्वास वाढीस लागावा, न्यूनगंड निर्माण होऊ नये यासाठी नानाविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा पांढरा शर्ट खाकी पँटऐवजी आता विद्यार्थी रंगीबेरंगी आकर्षक नवीन गणवेश, बूट टायसह दिसत आहे. पांढरा शर्ट खाकी पँट म्हणजे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी ही ओळख पुसून टाकणार आहे.