आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेके टॉवर्सच्या पार्किंगवरील अतिक्रमण जमीनदोस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाहन तळासाठी आरक्षित ठेवलेल्या जेके टॉवर्सच्या पाठीमागील पार्किंगच्या जागेवरील अतिक्रमण अखेर आज सकाळी जमीनदोस्त करण्यात आले. जेसीबीसह अतिक्रमण हटाव पथकाने काही तासांतच सुरक्षा भिंतीसह सर्व अतिक्रमण काढून जागा मोकळी केली. डीबी स्टारने वृत्त प्रसिद्ध करून त्याचा वारंवार पाठपुरावाही केला होता. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांना त्यांची वाहनतळाची जागा मिळाली.
अदालत रोडवरील नगर भूमापन क्रमांक १८०३६ या जागेचे मूळ मालक डॉ. जीवन करजगावकर आणि इतरांनी त्यांची जागा जेथलिया बिल्डर्स यांना सन १९९० ते ९२ च्या दरम्यान विकसित करण्यासाठी दिली होती. या इमारतीमध्ये चार्टर्ड अकाउंटंट, तसेच विविध कार्यालये, कोचिंग क्लासेस, दुकाने आणि बँका कार्यरत आहेत. या इमारतीच्या खरेदीदारांच्या खरेदीखतामध्ये वाहनतळाची जागा ही इमारतीच्या दक्षिण बाजूने दाखविलेली होती. तसेच साइड मार्जिनदेखील सर्व बाजूंनी सोडल्याचेही नमूद होते. याचबरोबर इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या वाहनतळ आणि साइड मार्जिनच्या जागेचा नगररचना विभागाने दिलेल्या अंतिम मंजूर रेखांकनात उल्लेखही होता. काही वर्षांपूर्वी या इमारतीत कमलनयन बजाज हॉस्पिटलही कार्यरत होते. ते नव्या जागेत स्थलांतरित झाल्यानंतर ही जागा देवगिरी बँकेकडे गहाण होती. मूळ मालकाने बँकेचे कर्ज फेडल्यामुळे या इमारतीचा लिलाव होऊन ती निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद राजपूत यांनी विकत घेतली.

साइडमार्जिन जागेवर कब्जा
त्यानंतर डॉ. राजपूत यांनी या जागेवर कब्जा करण्याचा इराद्याने आधी मुरमाचा भराव टाकून जागेचे सपाटीकरण केले. नंतर वाहनतळाचे प्रवेशद्वार पाडून कायमस्वरूपी सुरक्षा भिंत बांधत साइड मार्जिनच्या जागेवर अंडरग्राउंड बांधकाम सुरू केले. याविरोधात जे. के. टॉवरच्या पदाधिकाऱ्यांनी आणि तेथील रहिवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. त्यावर मनपाने फक्त नोटिसांचा साेपस्कार पार पाडला. प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने अतिक्रमणधारकांचा दावा फेटाळला, तरीही अतिक्रमणाकडे मनपा प्रशासन डोळेझाक करत होते.

प्रकरण डीबी स्टारकडे
यानंतर वैतागलेल्या पदाधिकाऱ्यांनी डीबी स्टारकडे कैफियत मांडली. चमूने याप्रकरणी तक्रारदारांकडे असलेल्या उपलब्ध पुराव्यांचा तंतोतंत अभ्यास करून इमारतीचा बांधकाम परवाना, मूळ मंजूर रेखांकनाची परिपूर्ण शहानिशा केली. त्यावर २१ सप्टेंबर रोजी ‘पार्किंगच्या जागेवर कब्जा, बांधकाम करून केले अतिक्रमण’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यावर अतिक्रमण विभागाने तातडीने पाहणी केली, पण पुन्हा चौकशीच्या नावावर अतिक्रमण काढण्यास चालढकल सुरू केली. दरम्यान, मनपाच्या विधी सल्लागार अपर्णा थेटे यांनी २७ जुलै २०१६ रोजी अतिक्रमण विभागाला कारवाईबाबत लेखी सूचना दिल्याचे पत्र चमूच्या हाती लागले. यावर पुन्हा १० ऑक्टोबर २०१६ रोजी ‘जेके टॉवर्सच्या पाठीमागील पार्किंगच्या जागेवरचे अतिक्रमण अजूनही तसेच’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा सुरूच ठेवला.

डीबी स्टार दणका
डीबी स्टारने सातत्याने पाठपुरावा करून ही दोन वृत्ते प्रसिद्ध केली. या वृत्तांमुळेच मनपा आयुक्त बकोरिया यांना सर्व कल्पना आली आणि त्यांनी लगेच दखल घेऊन कारवाई केली.
अधिकाऱ्यांवर कारवाई करणार : आयुक्त बकोरिया

गेल्या चार वर्षांपासून सर्व पुरावे असतानाही आमच्या अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही, याची चौकशी करणार असल्याचे मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले. अजून खऱ्या अर्थाने कारवाई पूर्ण झालेली नाही. अतिक्रमण काढण्यात चालढकल करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केल्यानंतरच ती पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. एवढेच नव्हे, तर गेल्या वर्षभरात अतिक्रमण विभागाकडे अतिक्रमणासंदर्भात किती तक्रारी आल्या कितींचा निपटारा झाला, याचे ऑडिटही त्यांनी मागवले आहे.

अखेर आम्हाला न्याय मिळाला
चार वर्षे पाठपुरावा केला. मनपाने नोटीस बजावली. त्याचाच आधार घेत अतिक्रमणधारक न्यायालयात गेले. तेथेही त्यांचा अर्ज फेटाळला आम्ही पुन्हा सर्व पुरावे घेऊन पाठपुरावा केला, पण मनपा प्रशासन जागे होत नव्हते. डीबी स्टारचे वृत्त प्रसिद्ध होताच आयुक्तांनी दखल घेतली आम्हाला न्याय मिळाला. -लक्ष्मीनारायणअट्टल, अजय पांडे, सी. एस. सोनी, अनुप अट्टल, सर्वपदाधिकारी. जे. के. टॉवर असोसिएशन

आयुक्तांनी घेतली दखल
वृत्त प्रकाशित होताच मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी याप्रकरणी तातडीने अतिक्रमण विभागाचे प्रमुख रवींद्र निकम यांच्याशी चर्चा केली. माहिती जाणून घेतली. त्यानंतर अतिक्रमण विभागाचे पदनिर्देेशित अधिकारी एम. एम. खान यांच्यामार्फत या प्रकरणाची संचिका मागवली. प्रकरणाचा अभ्यास केला आणि डीबी स्टारच्या वृत्तावर शिक्कामोर्तब होताच तातडीने अतिक्रमण विभागाला हे अतिक्रमण तातडीने हटवण्याचे आदेश दिले.

अतिक्रमण जमीनदोस्त
त्यानंतर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास पदनिर्देशित अधिकारी एम. एम. खान, इमारत निरीक्षक आर. एस. राचतवार हे जेसीबी पथकासह दाखल झाले. अतिक्रमण हटाव पथकाने धडक कारवाई करत या इमारतीतील वाहनतळाच्या जागेवरील बांधकाम जमीनदोस्त केले. वाहनतळाची जागा जे. के. टॉवर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमक्ष मोकळी करून रहिवाशांच्या ताब्यात दिली.

पार्किंगची जागा मोकळी केली
मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या आदेशाने उपायुक्त रवींद्र निकम यांनी आजच अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार हे अतिक्रमण काढण्यात आले आहे. आता ही जागा वाहनतळासाठी जे. के. टॉवर असोसिएशन आणि इमारतीतील रहिवाशांसाठी कायमस्वरूपी खुली ठेवण्यात येईल. एम.एम. खान, पदनिर्देशितअधिकारी, आर.एस. राचतवार, इमारतनिरीक्षक, महानगरपालिका.

बातम्या आणखी आहेत...