आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील पहिले एअरशिप उडाले जेएनईसीच्या प्रांगणात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘लायटर दॅन एअर’ म्हणजेच एलटीए तंत्राचा वापर करून शुक्रवारी (21 मार्च) जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात पहिले एअरशिप झेपावले. 3 ते 4 मीटर क्यूब हायड्रोजन भरलेले हे एअरशिप हवेत झेपावताच एकच जल्लोष झाला. 4 मीटर लांबी आणि दीड मीटर रुंदीच्या एअरशिपला अडीच किलोमीटरच्या क्षेत्रापर्यंत रिमोटवर ऑपरेट करता येत असल्याचे प्रा. सुदर्शन धारूरकर यांनी सांगितले.
आयआयटी मुंबई येथील संशोधक विद्यार्थी विशाल शर्मा, विवेक कुमार, उदय अँलन आणि सचिन मनकर यांनी या एअरशिपची निर्मिती केली. आयआयटीचे प्रा. डॉ. राजकुमार पंत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी हे संधोधन करत आहेत. दूर अंतरावर टेहाळणी करणे, वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासपूर्ण सर्वेक्षण करण्यासाठी तसेच चित्रीकरण करण्यासाठी हे एअरशिप उपयुक्त आहे. याशिवाय प्रवासी वाहतूक आणि दळणवळणासाठीही याचा वापर परदेशात होत असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. यासाठी नायलॉन कोटेड पीव्हीसीचा वापर केला जातो. यामध्ये पॉली युरिथिन, मेटलाइज, पॉलिमर आणि नायलॉन शीट्स यांचाही समावेश आहे.
एरोस्टॅट आणि एअरशिप यांच्यात फरक
एरोस्टॅट हे एकदा हवेत सोडले की ठरावीक काळासाठी ते हवेत तरंगत राहतात. वरून विविध निरीक्षणे तसेच सैन्यात शत्रुवर नजर ठेवण्याचे काम याद्वारे शक्य आहे. आयपीएलसारख्या सामन्याप्रसंगी टॉप व्ह्यू चित्रीकरणासाठी कॅमेरे यामध्ये लावले जातात. हे एकाच ठिकाणी उभे राहते. तर एअरशिप हे एका जागेवरून दुसर्‍या जागेवर जाऊ शकते. यामधून प्रवासी वाहतूक करणे शक्य आहे. परदेशात असलेल्या एअरशिपमध्ये एकावेळी 12 प्रवासी बसू शकतात.