आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्षामुळे जॉगिंग पार्कची वाताहत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिडकोकडून मनापाकडे हस्तांतरण झाल्यानंतर शहरातील अनेक उद्यानांची मनपाने देखरेख ठेवली नाही. यामुळे अतिशय चांगली असणारी अनेक उद्याने, जॉगिंग पॉर्क आज अडगळीत पडले आहेत. हीच अवस्था सिडको एन-8, गुलाब विश्व हॉल समोरील जॉगिंग पार्कची झाली आहे. केवळ दुर्लक्षामुळे या जॉगिंग पार्कची वाताहत झाली आहे.

सिडकोच्या ताब्यात असताना जांभूळ वन म्हणून प्रसिद्ध असलेली ही जागा मनपाच्या ताब्यात आली. नंतर या जागेवर लोकाग्रहास्तव आमदार निधीतून जॉगिंग पार्क बांधण्यात आला. यामुळे येथे फिरायला येणार्‍या नागरिकांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली. यानंतरही बरीच मोठी जागा शिल्लक असूनही योग्यप्रकारे विकास करण्यात आला नाही. या जागेत लहान मुलांसाठी खेळणी, फिरण्यासाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी बाकडे अशा सुविधा देऊन पार्क विकसित करता आला असता. मात्र मनपाने दुर्लक्ष केल्यामुळे ही जागा परिसरातील उनाड मुलांचे खेळाचे मैदान बनले. येथे फिरण्यासाठी येणार्‍या नागरिकांना व रहिवाशांना त्रास देत असल्यामुळे वॉर्ड 26 च्या नगरसेविकेने जॉगिंग पार्कचे मैदान खोदून टाकले. असे करण्यापेक्षा या जागेचा योग्य विकास करून देखरेख ठेवली असती तर ही परिस्थिती ओढवली नसती असे या भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे.

सुविधा द्याव्यात
फिरायला येणार्‍यांसोबत लहान मुलेही मोठय़ा प्रमाणावर येतात. त्यांच्यासाठी येथे खेळणी व विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. - अब्दुल अजीम, रहिवासी

पार्कमधील मोकळ्या जागेत हिरवळ केल्यास जागेचा चांगला उपयोग होऊ शकतो. व़ृद्ध नागरिकांना बसण्यासाठी बाकड्यांची सुविधा करून द्यावी. व्यायामाचे साहित्य दिल्यास तरुणांनाही याचा फायदा होईल. - सय्यद हबीब, रहिवासी

या जॉगिंग पार्कच्या दुरवस्थेविषयीची तक्रार आमच्यापर्यंत आली नाही. नागरिकांनी मागणी केल्यास या जागेचा विकास करून देण्यासाठी मनपाकडून मदत करण्यात येईल. अफसर सिद्दिकी, कार्यकारी अभियंता, मनपा

जॉगिंग ट्रॅकवर गवत
जॉगिंग पार्कची जागा साधारण 12 ते 15 हजार चौरस फूट आहे. या जागेला कंपाउंड वॉल बांधण्यात आले नाही. ठिकठिकाणी मोठे गवत उगवल्यामुळे चालण्यासाठी जागाच शिल्लक नाही. वॉकिंग ट्रॅकवर लहान-लहान काटेरी झुडपे व गवत उगवल्यामुळे याचा वापर होत नाही. अनेक वर्षांपासून येथे साफसफाई करण्यात आली नाही. यामुळे सकाळी फिरण्यासाठी येणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळी फिरण्यासाठी येणारे नागरिक व रहिवाशांना क्रिकेट खेळण्यासाठी येणार्‍या मुलांचा त्रास वाढला होता. यामुळे मैदानात ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आले. मनपा आयुक्तांनी मान्यता दिल्यास पार्क विकसित करण्याचा आमचा मानस आहे. -प्राजक्ता भाले, नगरसेविका