आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शंभर वर्षांत झाले नाही तेवढे अध:पतन माध्यमांचे 25 वर्षांत झाले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मागील शंभर वर्षांत माध्यमांचे जे अध:पतन झाले नाही ते 25 वर्षांत झाले आहे. आज भांडवलदारी आणि आर्थिक उदारणीकरणातून वेगळ्या प्रकारची मूल्ये शिरकाव करत आहेत. त्यामुळे आयडॉलॉजी संपत चालली आहे, असे जळजळीत मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभागातर्फे गुरुवारी ‘प्रसार माध्यमे व समाजपरिवर्तन’ या विषयावर वागळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होते.

समाजपरिवर्तनाचे खरे कार्य चळवळी आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून केले जाते. त्यासाठी पोषक वातावरण निर्मितीचे काम मात्र माध्यमे पार पाडतात.

वागळे म्हणाले, वादाचे सगळे किल्ले कोसळून पडत आहेत. साम्यवादाचा, राजकारणाचा चेहरा बदलला आहे. गेल्या काही वर्षांत राजकारण, न्यायव्यवस्था आणि माध्यमांचा दर्जाच घसरत आहे.

पत्रकारितेत अनेक बदल
वर्तमानपत्रे प्रॉडक्ट म्हणून विकायला सुरुवात झाल्यानंतर माध्यमांमध्ये पेड न्यूज येण्यास सुरुवात झाली. 1985-2000 पर्यंतचा काळ पत्रकारितेसाठी दुख:दायक होता. याच काळात संपादकांची जागा मॅनेजरने घेतली. मार्केटिंग आणि जाहिरातींमुळे संपादकांचे महत्त्व कमी झाले. विश्वासार्हता माध्यमांचे मालक नाही, तर फक्त पत्रकारच देऊ शकतो हे सिद्ध झाले. देशात 400 वृत्तवाहिन्या आहेत. मात्र, यामध्ये फायद्याची कुठलीच नाही. मग या वाहिन्या चालतात कशा, तर यामध्ये काळा पैसा, राज्यकर्त्यांचा पैसा गुंतला आहे अशी सडेतोड टीका त्यांनी केली. भारतातील अशा माध्यमांना वेसण घालण्यासाठी जनतेने जागृत राहणे गरजेचे आहे, असे आवाहन वागळे यांनी केले. या वेळी विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. वि. ल. धारूरकर, प्रा. दासू वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.