आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धीची चिन्हे दिसताच होतो हल्ला - निळू दामले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रत्येक माणसाला श्रीमंत करू शकेल एवढा पाऊस मराठवाड्यात पडत असताना दुष्काळाची कारणे शोधण्याची तयारी दिसत नाही. म्हणूनच चाळीस-चाळीस वर्षे दुष्काळ संपत नाही. भारतीय माणसाला समृद्धीची सवयच नाही. त्यामुळे कुठेही समृद्धीची चिन्हे दिसली की लोक त्यावर तुटून पडतात, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार-लेखक निळू दामले यांनी सामाजिक मानसिकतेवर भाष्य केले. अरविंद वैद्य स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

ज्येष्ठ पत्रकार अरविंद वैद्य यांच्या दुसर्‍या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी महसूल प्रबोधिनीत झालेल्या एका कार्यक्रमात निळू दामले यांना निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांच्या हस्ते पुरस्काराने गौरवण्यात आले. अध्यक्षस्थानी दै. ‘दिव्य मराठी’चे स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर होते.

त्याला उत्तर देताना दामले यांनी त्यांची पत्रकारिता, समाजाची मनोभूमिका यावर परखड मते मांडली. ‘मराठवाडा’ दैनिकात काम केल्याने त्यांचा मराठवाड्याशी जवळून संबंध आला होता. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, मी पाहिलेला 1972 चा आणि आजचा दुष्काळ यात काहीही फरक नाही. एकच प्रश्न 40 वर्षे शिल्लक कसा राहतो? उस्मानाबादचा सरासरी पाऊस 750 मिमी आहे. इस्रायल आणि अफगाणिस्तानचा त्याच्या निम्मा. 750 मिमी हा पाऊस माणसाला श्रीमंत करण्याएवढा आहे. ते म्हणाले , जगायचे असेल तर शेती हे एकमेव साधन नाही, हे आधी स्वीकारले पाहिजे. जपानने नैसर्गिक साधनसंपत्तीशिवाय उद्योगांच्या माध्यमातून प्रगती केली. कोरियानेही इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचा वापर करून प्रगती केली. इथिओपियासारखा भुकेकंगाल देश शेती लीजवर देत संपन्नतेच्या दिशेने निघाला आहे.

न्या. बी. एन. देशमुख म्हणाले की, समाजाच्या घडणीसाठी चिंतनशील पत्रकार निर्माण होणे आवश्यक आहे. पुरस्कारांसाठी लेखन करू नये; पण जे लिहितो त्याचा पुरस्कार करण्यासाठी लिहायला हवे. माध्यमांच्या जगात झपाट्याने बदल झाले. आता आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत घडामोडी यांना वेगळे करता येत नाही. त्याचा देशावर, समाजावर परिणाम होत असतो. त्यावर प्रकाश टाकण्याचे काम निळू दामले यांनी केले आहे.

अभिलाष खांडेकर यांनी पत्रकारितेत मूल्ये ढासळल्याची चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, अरविंद वैद्य यांनी ज्या काळात पत्रकारिता केली तो काळ बदलला. माध्यमे वाढली. जुनी पत्रकारिता आज राहिली नाही; पण ती जी मूल्ये होती त्यांची आज नितांत गरज आहे. आजचे पत्रकार खूप कमी वाचतात, अशी खंत व्यक्त करीत ते म्हणाले की, वाचन कमी असल्याने विश्लेषणात्मक पत्रकारिता दिसत नाही. आज समाजासमोर असणार्‍या आव्हानांचा विचार करता वेगळे काही करणे गरजेचे आहे. वाचणार नाहीत तोपर्यंत विषय कळणार नाहीत, लिखाण होणार नाही. संजय वरकड यांनी प्रास्ताविक तर, सूत्रसंचालन प्रेषित रुद्रवार यांनी केले. प्रमोद माने यांनी आभार मानले.

गरिबी, श्रीमंती आणि लवासा
‘लवासा’ या गाजलेल्या वादग्रस्त पुस्तकाबाबत बोलताना ते म्हणाले की, आतापर्यंत समृद्धी, श्रीमंती विशिष्ट गटांपुरतीच होती; पण आता समृद्धी सहजसाध्य आहे. भारतीय माणूस गरिबीवर प्रेम करतो, असुरक्षितता व स्वत:बद्दल विश्वास नसल्याने त्याला समृद्धी नको वाटते. देशाला समृद्धीची सवय नसल्याने समृद्धीची चिन्हे दिसली की लोक त्यावर हल्ला करतात. तुटून पडतात. ही मानसिकता आता बदलावी लागेल. लवासाबाबत ओरड होत असते; पण सर्व सुविधांनी युक्त, संपन्न असे शहर प्रत्येक माणसाला मिळेल अशी व्यवस्था करायला हवी. हे पुस्तक लिहिताना खूप फिरलो. त्या वेळी लक्षात आले की, आपल्याकडे समृद्धी, वेल्थ क्रिएशन हे शब्दच उच्चरले जात नाहीत. मी श्रीमंत झालो तर माझ्याबरोबर माझा देश श्रीमंत होईल; पण समाजवाद, साम्यवाद अमुक वाद या वादांत अडकलेल्यांना त्यापलीकडचे दिसतच नाही. आता सगळी नव्याने मांडणी करण्याची गरज आहे, असेही दामले यांनी या वेळी बोलताना सांगितले.