आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामवाल्या मावशींच्या पगारातून आर.डी., जॉय ऑफ गिव्हिंगचा गृहिणींचा नवा पॅटर्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कांताबाई घरोघर काम करून आपले घर चालवतात; पण या उत्पन्नात भविष्याची तरतूद करण्याची सोयच नसते. मग त्यांना एका घरात थोड्या अधिकारानेच त्यांच्या महिन्याच्या पैशांतील ठरावीक रक्कम आर.डी.मध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तीन वर्षांनंतर कांताबाईंना या बचतीतून एकरकमी मोठी रक्कम हाताशी आली. दुसरे उदाहरण भारती मावशींचे. 14 वर्षांपासून ज्या घरात त्या काम करतात, त्या घराच्या मालकिणीने त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलत तिला ग्रॅज्युएट केले, आज ती अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम करते. ही दोन उदाहरणे आहेत, जॉय ऑफ गिव्हिंगची!

घरकाम करणार्‍या महिला केवळ एक पगारी नोकर असल्या तरी कालांतराने त्या घरातील एक घटक बनून जातात. मग त्यांची सुख, दु:खे आपली होतात. त्यांच्यासाठी हात पुढे येतात. उल्कानगरीतील प्रतीक प्लाझामधील तीन महिलांनी हे ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ आपल्या अंगी बाणवले आहे. स्वाती रेवलकर या गृहिणीने त्यांच्याकडे काम करणार्‍या भारती खोतकर कुटुंबातील घटक असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, भारती मावशी 14 वर्षांपासून कामाला आहेत. त्या कुटुंबातील सदस्यच बनल्या. त्यांची मुलगी दहावीला होती. दहावीनंतर पुढे शिकवणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले होते; पण आम्ही तिला शिकू दे, असे सांगत तिच्या शिक्षणाला हातभार लावला. तिने बीएपर्यंत शिक्षण घेतले आणि आता ती अंगणवाडी शिक्षिका आहे. दिवाळीला आपण घरात किराणा भरतो, तसे त्यांच्यासाठीही किराणा भरतो. भारती मावशींच्या मुलीच्या लग्नावेळी, मुलाच्या शिक्षणासाठी मदत करीत असतो.

अपूर्वा घाणेकर या कोडलीकेरी हॉस्पिटलमध्ये अँडमिनिस्ट्रेशन इन्चार्ज आहेत. त्यांना सकाळीच पटापट काम उरकून ऑफिसला निघावे लागते. अशा वेळी घरकामाला असणार्‍या कांताबाई खूप महत्त्वाच्या असतात. गेल्या आठ वर्षांपासून काम करणार्‍या कांताबाईंना शक्य तेवढी मदत करतो, हे सांगत घाणेकर म्हणाल्या, मी रुग्णालयात काम करत असल्याने त्यांना आजारपणातील उपचार, औषधी ही मदत तर करतेच; पण त्यांच्या दरमहा पगारातून 500 रुपये मीच आर.डी.मध्ये टाकायचे. उरलेले पैसे हातात द्यायचे. तीन वर्षे त्यांची ही आर.डी. चालली. त्यातून त्यांना वेळेला मोठी आर्थिक मदत उभी राहिली. कांताबाई त्या आर.डी.मुळे मोठे काम झाले हे कबूल करतात.