आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ शेतकर्‍यासाठी आता महावितरण-जीटीएल पुढे आले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चिकलठाणा येथील तरुण शेतकरी कैलास रिठे यांना हद्दीच्या वादामुळे महावितरण व जीटीएलकडून वीज मिळत नव्हती. हा भाग नेमका शहरात आहे की ग्रामीण भागात यावर जीटीएल व महावितरणचे तळ्यात-मळ्यात सुरू होते. सप्टेंबर 2012 मध्ये विजेच्या कनेक्शनसाठी रिठे यांनी दोन्ही कंपन्यांकडे अर्ज केला, पण हा भाग आमच्या हद्दीत येत नाही, असे दोन्ही कंपन्यांनी लेखी उत्तर रिठे यांना दिले. हताश झालेल्या रिठे यांना काय करावे सुचेना. पाच लाख रुपये खर्च करून विहीर खोदली, भरपूर पाणीही लागले; पण वीज नसल्याने हे पाणी बागेला देता न आल्याने सीताफळाची बाग जळाली. शेवटी रिठे यांनी आपली कैफियत डीबी स्टारकडे मांडली. 13 एप्रिल रोजी ‘हद्दीच्या वादात शेत जळाले’ या मथळ्याखाली रिठे यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.

हे वृत्त प्रसिद्ध होताच जीटीएल व महावितरणच्या अधिकार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली. आधीच भयाण दुष्काळ अन् त्यात आपल्या चुकीने एखाद्या शेतकर्‍याचे शेत उजाड झाल्याची माहिती मिळताच महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी स्वत:हून चमूशी संपर्क साधला. रिठे यांचा फोन नंबर घेऊन त्यांनी तत्काळ त्यांच्याशीही संपर्क साधला. तसेच जीटीएलचे प्रमुख जगदीश चेलरमानी यांनीही अधिकार्‍यांना या जागेचा सर्व्हे करण्यासाठी पाठवले. दोन्ही कंपन्यांनी रिठे यांचा प्रश्न निकाली काढण्याचा निश्चय केला आहे.

या वीज तारांचा वाली कोण?

चिकलठाणा भागातील शेतकर्‍यांच्या शेतातल्या वीज तारा खूप खाली आल्याने शेतकरी हैराण आहेत. त्या लोंबकऴून खूप खाली आल्याने शेतकर्‍यांसह शेतात काम करणार्‍या मजुरांच्या जिवाला धोका आहे. या तारा आवळण्यासाठीही जीटीएल आणि महावितरणमध्ये टोलवाटोलवी चालू आहे.