आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल पंपाची भिंत पाडण्याच्या हट्टामुळे तणाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पेट्रोल पंपाच्या मालकाने भिंत बांधून अडवलेला रस्ता रहिवाशांसाठी मोकळा केला जाणार नाही तोपर्यंत वृद्धेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाहीत, या मागणीवर तक्षशिलानगरवासीय अडून बसले. त्यामुळे सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास जुना मोंढा येथील पेट्रोल पंप परिसरात दोन तासांपर्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पेट्रोल पंपावरील कामकाज ठप्प झाले. त्यामुळे पोलिस संरक्षणात हा पेट्रोल पंप सुरू करावा लागला. पोलिसांनी पंपमालकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जुना मोंढा रस्त्यावरील जैन पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस तक्षशिलानगर आहे. या पेट्रोल पंपाचे मालक प्रवीण जैन यांच्या वडिलांनी तक्षशिलानगरातील रहिवाशांसाठी रस्ता मोकळा करून दिला होता. मात्र रहिवाशांच्या त्रासामुळे जैन यांनी 16 जून 2012 रोजी पोलिस बंदोबस्तात या रस्त्यावर भिंत बांधली होती. त्या वेळी तक्षशिलानगरातील रहिवाशांनी मोठा गोंधळ घातला होता. त्यामुळे पोलिस निरीक्षक गफूर पाटील यांना लाठीमार करावा लागला होता. रविवारी तक्षशिलानगरातील सामाजिक कार्यकर्ते कैलास जाधव आणि विलास जाधव यांच्या आजी सखुबाई गणपत जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी 9 वाजता काढण्यात आली. पेट्रोल पंपाची भिंत पाडूनच तेथून अंत्ययात्रा नेण्याचा हट्ट जाधव कुटुंबीयांनी केला. यामुळे सकाळी साडेनऊच्या सुमारास पेट्रोल पंप परिसरात गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पेट्रोल पंपावरील व्यवहार ठप्प झाले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक गफूर पाटील, उपनिरीक्षक आशिष लवंगळे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी पेट्रोल पंप मालक प्रवीण जैन यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जाधव कुटुंबीयांनी पाठीमागील रस्त्याने अंत्ययात्रा नेली.

आमच्या मालकीची जागा

पेट्रोल पंपाची जागा आमच्या मालकीची आहे. आम्ही महानगरपालिकेकडून परवानगी मिळवून पोलिस बंदोबस्तात भिंतीचे बांधकाम केले. तक्षशिलानगरातील रहिवाशांचा त्रास वाढत असल्याने वर्षभरापूर्वी ही भिंत बांधली. सहा महिन्यांपूर्वी पेट्रोल पंपाला आग लागली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, अशी माझी इच्छा आहे, असे प्रवीण जैन यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

शिष्टमंडळाने घेतली उपायुक्त चावरियांची भेट

शब्बू लखपती यांच्यासह कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त अरविंद चावरिया यांची सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भेट घेतली. या वेळी जैनदेखील हजर होते. लखपती यांनी जैन यांच्याविरुद्ध आमची कोणतीही तक्रार नसून त्यांनी केलेले बांधकाम कायदेशीर असल्याचे उपायुक्तांना सांगितले. तक्षशिलानगरातील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी आणखी दोन रस्ते असून गोंधळ सुरू असल्याचे समजल्याने आम्ही तेथे गेलो असेही त्यांनी सांगितले. चावरिया यांनी याप्रकरणी नियमानुसारच कारवाई केली जाईल, असे सांगितले. मंगळवारी पुन्हा या विषयावर तोडगा काढण्यासाठी बैठक होणार आहे.