आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या मोंढ्यातील दुकाने दिवसांत नव्या मोंढ्यात हलवा, नाही तर कारवाई करू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जुना मोंढा नाका येथील दुकाने सात दिवसांत नवीन मोंढा (जाधववाडी) येथे हलवा; अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार, मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी जुन्या मोंढ्यातील व्यापाऱ्यांना दिला.
जुना मोंढा येथे येणारे मालट्रक इतर वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे अनेकदा भांडणे होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. ही बाब लक्षात घेता मंगळवारी सकाळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार आणि मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी जुन्या मोंढ्याची पाहणी केली. ज्या व्यापाऱ्यांना जाधववाडी येथील नव्या मोंढ्यात गाळे मिळाले आहेत त्यांनी तेथे स्थलांतरित व्हावे असे आदेश दिले.

स्थलांतराचे न्यायालयाने दिले होते आदेश : वाहतुकीच्याप्रश्नामुळे १९९८ मध्ये जाधववाडी येथे मार्केट यार्डला मान्यता मिळाली. जुना मोंढा डी नोटिफाइड एरिया म्हणून घोषित करण्यात आला. बहुतांश व्यापाऱ्यांनी जाधववाडीत दुकाने हलवली. मात्र २५ पेक्षा अधिक मोठ्या व्यापाऱ्यांनी जुना मोंढा सोडलाच नाही. या विरोधात व्यापारी संजय पहाडे यांनी २००५ मध्ये उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर न्यायालयाने जुन्या मोंढ्यातील व्यापार बंद करून तो जाधववाडीत स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले, पण प्रत्येक वेळी राजकीय हस्तक्षेप झाल्याने जुना मोंढा स्थलांतरित होऊ शकला नाही.
११वर्षांनंतर प्रथमच ठोस कारवाई : मागील११ वर्षांनंतर जुन्या मोंढ्यातील दुकान हलवण्याचे आदेश प्रशासनाकडून मिळाले. या बाजारात हजारो क्विंटल अन्नधान्य, किराणा, मसाल्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार होतो. वाहनांच्या गर्दीमुळे हजारो नागरिकांना मोंढ्यातील रस्त्यांचा वापर करता येत नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही ही बाजारपेठ सुरू आहे. मात्र, पोलिस आयुक्त अमितेशकुमार मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी ठोस कारवाई करण्यासाठी सोमवारी विशेष बैठक घेतली. बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांना कारवाई करण्याबाबत कळवले. नियोजनानुसार मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास तिघेही फौजफाट्यासह जुना मोंढा येथे हजर झाले. व्यापाऱ्यांना बस्तान गुंडाळण्यास सांगितले. विचार विनिमयानंतर व्यापाऱ्यांना सात दिवसांची डेडलाइन देण्यात आली.

४०० गाळे बंद
जाधववाडीतील गाळे व्यापाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र बरेच जण जुन्या मोंढ्यातच ठाण मांडून असल्याने ४०० गाळे बंद आहेत. परिणामी बाजार समितीचे उत्पन्नही घटले आहे. एकाच ठिकाणी बाजारपेठ झाल्यास सर्वांच्याच फायद्याचे होणार आहे.

सुरक्षा देऊ
Ãनव्या मोंढ्यात सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलिस चौकी देण्यात येईल. मात्र सात दिवसांत व्यापाऱ्यांनी स्थलांतर करावे . अन्यथा कारवाई होईल. अमितेश कुमार,पोलिस आयुक्त

जागा दिल्यास स्थलांतर
Ãजागा उपलब्धकरून दिली तर आम्ही जाधववाडीत जाण्यास तयार आहोत. मात्र, गोळ्या, बिस्किटे आदी व्यापार येथे सुरूच राहणार आहे. संजय कांकरिया, अध्यक्ष, किराणा मर्चंट

सुविधा उपलब्ध व्हाव्या
Ãराजकीय हस्तक्षेपामुळे मोठे व्यापारी स्थलांतरित झाले नाहीत. त्यांना त्यावेळीच जाधववाडीत जागा दिली होती. काहींनी ती विकली आहे. नियमाप्रमाणे सर्वांना सुविधा देऊ. संजयऔताडे, सभापती, कृउबास
खासदारांची मध्यस्थी
यापूर्वी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मध्यस्थी केली होती. मात्र सध्या ते पोर्तुगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना या कारवाईबाबत विचारले असता दिवाळीपर्यंत हे स्थलांतर थांबवण्याबाबत मी पोलिस आयुक्तांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ट्रक येण्यास बंदी
वाहतुकीच्या कोंडीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याची तक्रार नगरसेवक मनोज बल्लाळ आणि हमाल संघटनांनी पोलिस आयुक्तांकडे सोमवारी केली होती. यापुढे जुना मोंढा परिसरात एकाही ट्रकला प्रवेश मिळणार नाही. रात्रीही हा मार्ग ट्रकसाठी बंद ठेवण्याचे आदेश अायुक्तांनी दिल्यानंतर मंगळवारपासून ही कारवाई सुरू झाली.

बातम्या आणखी आहेत...