आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिढा : सिडकोच्या नव्या कचरा डेपोला ग्रामस्थांचा विरोध ; पाणीपुरवठा योजनांना डेपोपासून नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - महानगरपालिकेसह सिडको प्रशासनही तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरालगत कचरा डेपोची मागणी करत आहे. त्याबदल्यात स्थानिकांना रोजगार व ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी उत्पन्नाच्या स्रोताचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आम्ही कुठल्याही परिस्थितीत गावालगत कचरा डेपो होऊ देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्यामुळे हा प्रश्न कसा निकाली लागणार याकडे परिसरातील नागरिकांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

वाळूजच्या सिडको परिसरातील कचरा संकलन व त्यावर प्रक्रिया करून गॅसची निर्मिती करण्यात येणार आहे. सदरील प्रक्रिया प्रकल्प राबवण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील गट नं २२७/१ या सरकारी जमिनीची आवश्यकता आहे. सदरच्या प्रकल्पामुळे मिळणाऱ्या उत्पन्नाचा फायदा गावकऱ्यांनाही होणार आहे. तसेच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, अशा आशयाचे पत्र सिडकोकडून तिसगावच्या ग्राम विकास अधिकाऱ्यांना ८ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाले आहे.

प्रशासनाची वक्रदृष्टी
यापूर्वी औरंगाबाद महानगरपालिकेने नारेगाव येथील कचरा डेपोसाठी तिसगाव शिवारातील खवड्या डोंगरालगतच्या शासकीय गायरान (गट नंबर २२७/१) मधील जागा कचरा डेपोकरिता ग्रमापंचायतीने द्यावी अशी मागणी केली होती. मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, खासदार चंद्रकांत खैरे, तहसीलदार विजय राऊत, उपविभागीय अधिकारी बप्पासाहेब थोरात आदींच्या पथकाने संबंधित खदानीच्या जागेची अत्यंत गोपनीयता पाळून १४ जानेवारी २०१४ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. दरम्यान, अधिकारी आल्याचे माहीत होताच गावकरी त्यांच्या भेटीला आले. मात्र आक्रमक गावकऱ्यांना पाहून त्यांच्याशी चर्चा न करताच अधिकाऱ्यांचे पथक निघून गेले.

मागील वेळी मनपाला विरोध करणारे गावकरी पुन्हा एकदा सिडको प्रशासनाला विरोध करण्यासाठी सज्ज असल्याची परिस्थिती गावात निर्माण झाली आहे.

...तर आंदोलन छेडणार
यापूर्वीसुद्धा गावकऱ्यांनी एकत्र येऊन मनपाच्या कचरा डेपोला विरोध केल्यामुळे तो प्रकल्प रद्द करण्यात आला. या वेळी सिडको प्रशासन कचरा डेपो उभारण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, या ठिकाणी कचरा डेपो उभारण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा गावकऱ्यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिला.
गावकऱ्यांचा कचरा डेपोला विरोध का?
कचरा डेपोमुळे परिसरात दुर्गंधीचा त्रास, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नियोजित कचरा डेपोच्या जागेलगतच वडगाव कोल्हाटी व तिसगाव ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेसह तलावही आहे. त्यामुळे जलसाठे दूषित होण्याची भीती व भविष्यात उद‌्भवणारा पाणीप्रश्न आदी कारणांमुळे गावकरी सदरील कचरा डेपोला कडाडून विरोध करत आहेत.
- तिसगाव परिसराच्या हद्दीतील जागेवर सिडको प्रशासनाने कचरा डेपोचा प्रकल्प उभारण्यापेक्षा त्यांच्याकडे असणाऱ्या उपलब्ध जागेवर हा प्रकल्प उभारावा. त्यास आमचा विरोध नाही.
संजय जाधव, माजी सरपंच, तिसगाव
- गावशिवारात कचरा डेपोच्या माध्यमातून सिडकोने घाण आणू नये. नागरी वसाहती व शेतजमिनींना धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे. प्रसंगी आम्ही आंदोलन छेडू.
अंजन साळवे, ग्रामपंचायत सदस्य, तिसगाव