आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kachner Ashram School Grabbed Lakh Of Rupees In Name Of Subsidy

बोगस कागदपत्रांवर कचनेर आश्रमशाळेचा डोलारा, लाखो रूपयांचे अनुदान लाटले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शिवगड तांडा आश्रमशाळाच नव्हे तर बनावट कागदपत्रांच्या आधारे विमुक्त जाती प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा, कचनेर तांडा अंतर्गतही मराठवाडा सेवा संघाचे अध्यक्ष रामसिंग चव्हाण आणि संचालक भीमसिंग चव्हाण यांनी शासनाचे लाखो रुपयांचे अनुदान लाटले आहे. संस्थेचे संचालक राजेंद्र सुंदरलाल जाधव यांना माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे हे घबाड उजेडात आले आहे.


याच संस्थेच्या शिवगड तांडा, आश्रमशाळेतील गैरप्रकार ‘दिव्य मराठी’ने 31 जानेवारी 2014 रोजी चव्हाट्यावर आणले. शिवगड आश्रमशाळेप्रमाणेच बनावट कागदपत्रांच्या आधारे कचनेर आश्रमशाळेचे अनुदान मिळवण्यासाठी भीमसिंग चव्हाण यांनी शक्कल लढवल्याचे कागदपत्रांमुळे स्पष्ट होते. समाजकल्याण विभागाने संबंधित गैरव्यवहाराची गंभीर दखल घेतली असून संस्थेवर कडक कारवाईचे संकेत सहायक समाजकल्याण आयुक्त जलील शेख यांनी दिले आहेत.
रामसिंग शंकरसिंग चव्हाण यांचे धाकटे बंधू भीमसिंग चव्हाण यांनी 16 ऑगस्ट 2002 (खरेदीखत क्रमांक 5206) रोजी 0.40 गुंठे (एक एकर) जागा श्रीचंद रेवा राठोड यांच्याकडून विकत घेतली. मात्र, ही जागा खरेदी करण्यापूर्वीच त्यांनी त्या जागेसाठी 17 एप्रिल 2001 रोजी ग्रामपंचायत कचनेरकडून बांधकाम परवानगी तर 29 डिसेंबर 2001 रोजी बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्रही मिळवले. यानंतर भीमसिंग चव्हाण यांनी विमुक्त जाती आश्रमशाळा, कचनेर तांडाच्या मुख्याध्यापकासोबत 28 जून 2001 रोजी भाडेचिठ्ठी करारनामा केला. या करारनाम्यात त्यांनी 12 खोल्या, 25 बाथरूम, कंपाउंड वॉल, एक एकर 18 गुंठे इतकी जागा (म्हणजे 58.5 गुंठे) कचनेर तांडा, गट नं. 95 मधील शाळेला भाड्याने देण्याचे ठरवले. स्वत:च्या मालकीची जागा नसताना भीमसिंग चव्हाण यांनी अत्यंत धाडसीपणे खोटी कागदपत्रे जमा करून हे कारस्थान केले. विशेष म्हणजे 3 ऑगस्ट 2002 रोजी मिळालेल्या सातबारानुसार गट क्रमांक 95 मध्ये भीमसिंग चव्हाण यांच्या नावाच उल्लेख कुठेच आढळत नाही.


भाडेचिठ्ठी करारनाम्यात खोटी माहिती :
भीमसिंग चव्हाण यांनी 16 ऑगस्ट 2002 (खरेदी खत क्रमांक 5206) रोजी 0.40 गुंठे जागा श्रीचंद रेवा राठोड यांच्याकडून खरेदी केली. यानंतर 17 ऑक्टोबर 2002 रोजी 0.18 (1/2) गुंठे इतकी (खरेदी खत क्रमांक 6463) जागा, तर 26 जून 2006 रोजी 0.11 गुंठे (खरेदी खत क्रमांक 2442) आणि 18 नोव्हेंबर 2006 रोजी 2 (1/4) गुंठे जागा खरेदी केली. ही सर्व जागा मिळून 72 गुंठे म्हणजे जवळपास पावणेदोन एकर इतकी होते. यानंतर त्यांनी मनोज भीमसिंग चव्हाण (मुलगा) याला 20 जानेवारी 2007 रोजी (20 गुंठे) जवळपास अर्धा एकर जागा विकली. ही जागा विकल्यानंतर भीमसिंग चव्हाण यांच्या नावे फक्त 52 गुंठे म्हणजे जवळपास सव्वा एकर जागा शिल्लक राहते. मात्र, 28 जून 2001 रोजी शाळेसोबत केलेल्या भाडेचिठ्ठी करारनाम्यात आपल्या नावे एक एकर 18.1/2 गुंठे इतकी जागा असल्याचे नमूद केले. यानुसार त्यांनी स्वत:च्या शाळेसाठी समाजकल्याण विभागाकडून 2002-03 पासून दरमहा 21969 नुसार वर्षाला 263628 तर आतापर्यंत जवळपास 25 लाखांच्या घरात इमारत भाडे घेतले आहे. करारनाम्यात नमूद केलेली इतकी जागा आजही त्यांच्या नावे नाही. मात्र, भाडे फायदा सुरूच आहे. या प्रकारामुळे बीड रोडवर असलेल्या कचनेर गावाहून एक किमी पुढे असलेल्या 1975-76 मध्ये स्थापन झालेल्या कचनेर तांडा आश्रमशाळेतील जवळपास 350 विद्यार्थ्यांचे (240 निवासी) भविष्य संकटात सापडले आहे. यासंबंधी भीमसिंग चव्हाण यांना माहिती विचारली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.


कारवाई करणार
आम्ही मराठवाडा बंजारा सेवा संघाला नोटीस बजावली आहे. त्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. मुदतीत त्यांनी कागदपत्रे सादर न केल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल. जलील शेख, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग.

विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही
0समाजकल्याण विभागाच्या चौकशीत मराठवाडा बंजारा सेवा संघाने केलेला गैरव्यवहार स्पष्ट झाला तर त्यांच्या संस्थेची, आश्रमशाळेची मान्यता रद्द होऊ शकते.
0समाजकल्याण विभागाकडून आतापर्यंत देण्यात आलेला सर्व निधी परत वसूल केला जाऊ शकतो.
0प्रकरण अधिक गंभीर असल्यास नियमानुसार फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो.
0शाळेची मान्यता रद्द झाली तरीही विद्यार्थ्यांचे नुकसान होत नाही. या विद्यार्थ्यांना दुसर्‍या शाळेत समायोजित केले जाते.