आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kadir Maulana Dismiss Demand Ncp Activist Aurangabad

कदीर मौलाना यांना पक्षातून काढा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘नगरसेवक काहीही काम करत नाहीत, त्यांच्या पार्श्वभागावर लाथा मारून हाकलून दिले पाहिजे’, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस कदीर मौलाना यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. आम्ही काम करत असताना लाथ मारा म्हणणार्‍या मौलाना यांनाच पक्षातून काढून टाकावे, अशी मागणी पक्षाच्या 12 पैकी 7 नगरसेवकांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. भरमेळाव्यात असे वक्तव्य करणार्‍या मौलाना यांना पक्षाबाहेरच नव्हे तर जिल्ह्याबाहेर काढावे, अशी मागणी महिला कार्यकर्त्यांनी केली आहे. मौलाना यांच्यावर पक्षाने योग्य ती कठोर कारवाई करावी, असे मत मनमोहनसिंग ओबेराय यांनी व्यक्त केले आहे.

येत्या 7 तारखेला पक्षाचा विभागीय मेळावा शहरात होत आहे. त्याच्या तयारीसाठी सोमवारी आयोजित बैठकीत मौलाना यांनी वरील वक्तव्य केले. यामुळे नगरसेवक संतप्त झाले असून त्यांनी मौलाना यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेस खलील खान, प्रल्हाद निमगावकर, जुबैर लाला, सुनील जगताप, अशोक बेहरे, अक्रम पटेल, अभिजित देखमुख यांच्यासह शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील, छाया जंगले, वीणा खरे आदी उपस्थित होते.

मेळाव्यावर बहिष्कार
नगरसेवकांना बदनाम करणार्‍या मौलाना यांच्याविरुद्ध पक्षाने कारवाई करावी. त्यांना पक्षातून काढून टाकण्यात यावे. रविवारच्या मेळाव्यात जर मौलाना व्यासपीठावर दिसले तर आम्ही मेळाव्यावर बहिष्कार घालू, असा इशारा नगरसेवकांच्या वतीने खलील खान यांनी दिला.

ही पक्षाची नालस्ती
मौलाना यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची नागरिकांमधील प्रतिमा मलिन झाली आहे. नगरसेवक चांगले काम करत असताना त्यांच्यावर असा आरोप करणे चुकीचे आहे. मनमोहनसिंग हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या वयाबद्दल कलुषित बोलणे चुकीचे आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही नेत्यांकडे केली असल्याचे गफ्फार कादरी यांनी सांगितले.

महिला म्हणतात, त्यांना जिल्ह्याबाहेरच ठेवा महिलांच्या उपस्थितीत मौलाना यांनी अश्लील तसेच असंसदीय शब्द वापरले. ते येथे राहिल्यास आम्ही काम करूच शकत नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष असलेले मौलाना यांना औरंगाबाद जिल्ह्याबाहेर ठेवण्यात यावे.

मी तसे बोललोच नाही
पक्षामध्ये जे पक्षविरोधात काम करतात त्यांच्यावर कारवाई व्हावी हे माझे म्हणणे होते. पक्षाचे नगरसेवक शिवसेना-भाजपचे काम करताहेत. मी असंसदीय शब्द वापरला नाही. पार्श्वभागावर लाथ मारण्याचे मी बोललो नाही. उद्या पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका मांडेन. लायकी नसताना विधानसभा निवडणूक लढवू पाहणारे राजकारण करताहेत. पक्षर्शेष्ठींना मी माझा अहवाल देणार आहे. कदीर मौलाना, प्रदेश सरचिटणीस

.. तर आम्ही राजीनामे देऊ
येत्या 7 तारखेपर्यंत मौलाना यांच्यावर कारवाई झाली नाही तर 8 तारखेला आम्ही सर्वजण नगरसेवकपदाचे राजीनामे देऊ. यात कोणतीही तडजोड होणार नाही. आम्हाला पुन्हा जनतेच्या समोर जायचे आहे. पक्षात असेच चालत राहिले तर नागरिक आम्हाला लाथा मारतील. प्रल्हाद निमगावकर, नगरसेवक.