आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैलासनगर-एमजीएम रस्त्याचा प्रस्ताव दुरुस्तीसह सादर करा : महापौरांचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जालना रोडवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कैलासनगर ते एमजीएम रस्ता रुंदीकरण, नूतनीकरणाचा प्रस्ताव कायदेशीर बाजूंनी परिपूर्ण करत दुरुस्त करून पाठवा, असे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी शुक्रवारी (२४ जुलै) सर्वसाधारण सभेत दिले.
कैलासनगर-एमजीएम रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमातील कलम ३७ अन्वये किरकोळ फेरबदल करावा. या बदलामुळे रुंदीकरणात येणाऱ्या आणि भूसंपादनाला नकार देणाऱ्या १२ मालमत्ताधारकांचा प्रश्न सुटेल, असे सुचवणारा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर मांडला होता. मात्र, चर्चेदरम्यान या प्रस्तावातील त्रुटी सदस्यांनी दाखवून दिल्या. राजू वैद्य म्हणाले की, या रस्त्याच्या कामात १२ मालमत्ता बाधित होत आहेत हे खरे आहे. मनपाने त्यांचे पुनर्वसन करावे अथवा नुकसान भरपाई द्यावी, पण कलम ३७ चा वापर करून फेरबदल करू नये. उलट वेळ पडली तर सक्तीने भूसंपादन करून हे काम केले पाहिजे. कारण निम्म्या शहराला सिडकोला जोडण्यासाठी पर्यायी महत्त्वाचा रस्ता असणे आवश्यकच आहे. मुळात असा प्रस्ताव आलाच कसा, असा सवालही त्यांनी केला.
नंदकुमार घोडेले यांनी या चर्चेसाठी नकाशा का दिला नाही, असे विचारत कलम ३७ च्या वापरावर न्यायालयाचा प्रतिबंध असताना हा प्रस्ताव आणणे न्यायालयाचा अवमान ठरेल, असे सांगितले. विधी सल्लागार ओ. सी. शिरसाठ म्हणाले की, विकास आराखड्यातील आरक्षण बदलाबाबत असलेल्या या कलम ३७ च्या वापराबाबत उच्च न्यायालयाने स्युमोटो याचिका केली आहे. त्यात आरक्षण बदलाला स्पष्टपणे प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे असा काही प्रस्ताव आणायचा असेल तर न्यायालयाची परवानगी घ्यावीच लागेल, असेही ते म्हणाले. उपअभियंता सदानंद खन्ना यांनी प्रस्ताव मंजूर झाल्यावर न्यायालयाची परवानगी घेऊ, असे अजब विधान केले. त्यावर सदस्य भडकले. तुम्हाला खरेच रस्ता करायचा आहे की नाही, असा थेट सवाल केला. राजेंद्र जंजाळ यांनी असा पायंडा पडला तर जागोजाग असेच फेरबदल करत बसावे लागतील. त्यापेक्षा सक्तीने भूसंपादन करा, कारण रस्ता होणे गरजेचे आहे, असा आग्रह धरला. त्यानंतर महापौरांनी कलम ३७ नुसार कारवाई करता त्रुटी दूर करा. न्यायालयाची परवानगी घेऊन प्रस्ताव आणा, असे निर्देश दिले.

...तर बदलाचा पायंडाच पडेल
यासंदर्भात ‘दिव्य मराठी’शी बोलताना महापौर म्हणाले की, शहरातील अनेक रस्त्यांचा मार्ग बदला. त्यासाठी विकास आराखड्यात किरकोळ फेरबदल करा, असा नागरिकांचा आग्रह आहे. कैलासनगर-एमजीएम रस्त्याच्या निमित्ताने आराखड्यात बदलाचा पायंडाच पडेल. अनेक रस्त्यांचे रुंदीकरण रखडू शकते. म्हणून आराखड्यात नमूद केल्यानुसारच रस्ता करावा, असा प्रस्ताव प्रशासनाने द्यावा, असे सभेचे म्हणणे आहे.