आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैलासनगर रस्त्याचा प्रस्ताव मांडण्यास महापौरांची मान्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जालना रोडवरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी कैलासनगर - एमजीएम या समांतर रस्त्याचे काम मार्गी लागावे, यासाठी ‘दिव्य मराठी’ने पुढाकार घेतला आहे. त्याला प्रतिसाद देत महापालिका प्रशासनाने या रस्त्यात येणारी घरे वाचवण्यासाठी पूल बांधणीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विकास आराखड्यात किरकोळ बदल करणारा प्रस्ताव २० जुलैच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यास महापौर त्र्यंबक तुपे यांनी मान्यता दिली आहे. शहराच्या विकासासाठी या रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाकडून येणाऱ्या परिपूर्ण प्रस्तावाला मंजुरी देऊ, असे महापौर, उपमहापौर प्रमोद राठोड, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनीही स्पष्ट केले.

जालना रोडवरील संभाव्य वाहतूक कोंडी १९७१ चा विकास आराखडा तयार करताना िनयोजनकारांच्या लक्षात आली होती. त्यामुळे त्यांनी जुना मोंढा चौक म्हणजे लक्ष्मण चावडी, कैलासनगर ते एमजीएम असा रस्ता प्रस्तावित केला होता. मात्र, त्याप्रमाणे रस्ता तयार करण्याकडे तत्कालीन नगर परिषद आणि त्यानंतर मनपानेही दुर्लक्ष केले. परिणामी रस्त्याच्या दुतर्फा बांधकामे झाली. काही भूखंडांवर मालकी हक्काचे वादही निर्माण झाले. २०११ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी या रस्त्याच्या रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली. परंतु, स्मशान मारुती मंदिरापर्यंत ती राबवून निधीअभावी सोडून देण्यात आली.
मुख्यमंत्री निधी मिळाला : ‘दिव्य मराठी’ने सहकारातून समस्यामुक्ती अभियानांतर्गत या रस्त्याचा पाठपुरावा करण्याचे ठरवले. याचा पहिला टप्पा फेब्रुवारी महिन्यात झाला. आमदार अतुल सावे यांनी मुख्यमंत्री निधीतून (२५ कोटी) या रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी सूचना केली. जिल्हा प्रशासनाने शहरातील प्रमुख दहा रस्त्यांची कामे करण्याचे ठरवले. त्यात या रस्त्याचा पहिल्या क्रमांकावर समावेश केला. दुसऱ्या टप्प्यात सावे यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासोबत रस्त्याची प्रत्यक्ष पाहणीही केली. त्यात काही बाबी समोर आल्या.

न्यायालयातही माहिती देणार
२००६मध्ये विकास आराखड्यातील भूखंड आरक्षण बदलण्याबद्दल एक याचिका दाखल झाली होती. त्या वेळी आराखड्यातील किरकोळ बदल किंवा आरक्षणाविषयी मनपाला काहीही निर्णय घ्यायचा असल्यास त्याची सविस्तर माहिती आधी सादर करावी, असे न्यायालयाचे निर्देश होते. त्यामुळे कैलासनगर - एमजीएम रस्त्याविषयी न्यायालयात माहिती दिली जाणार असल्याचेही पानझडे म्हणाले.

शहराच्या विकासाचे कोणतेही काम असेल तर त्यात एमआयएम नेहमीच अग्रस्थानी राहणार आहे. त्यामुळे कैलासनगर-एमजीएम रस्त्यासंदर्भात येणारा प्रस्ताव मंजूर करावा आणि काम वेगाने पूर्ण करावे, असा आग्रह एमआयएमकडून धरला जाणार आहे.
इम्तियाज जलील, आमदार

जालना रोडवरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी कैलासनगर - एमजीएम रस्ता होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रशासनाकडून येणाऱ्या परिपूर्ण प्रस्तावाला निश्चितच मंजुरी दिली जाणार आहे. हा प्रस्ताव अंितम मान्यतेसाठी तातडीने मंत्रालयात पाठवला जाईल.
त्र्यंबक तुपे, महापौर
बातम्या आणखी आहेत...