आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विस्थापितांना सोडत पद्धतीने प्लॉट वाटप, 121 मागासवर्गीयांना दोन लाख रुपये मंजूर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रस्ते रुंदीकरणात मालमत्ता संपादित के ल्यामुळे विस्थापित झालेल्या 140 जणांना सोमवारी मनपा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते प्लॉट वाटप करण्यात आले. 121 विस्थापित अनुसूचित जाती आणि नवबौद्ध असून त्यांना घरांसाठी रमाई योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील उर्वरित 19 जणांचे प्रस्ताव पाठवल्याचे डॉ. भापकर यांनी सांगितले.

कैलासनगर येथील 46 विस्थापितांना यापूर्वीच प्लॉट देण्यात आले आहेत. सोमवारी प्लॉट वाटप झालेल्यांत मकई गेट ते टाऊन हॉल भागातील 71, उस्मानपुर्‍यातील फुलेनगर ते गाडे चौक येथील 49 विस्थापितांचा समावेश आहे. हसरूलमध्ये या सर्वांना 600 चौरस फुटांचे प्लॉट देण्यात आले असून आतापर्यंत 186 विस्थापितांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मागासवर्गीयांसाठी पाठपुरावा करून रमाई योजनेचे दोन लाख रुपये मंजूर करण्यासाठी प्रयत्न केल्याचे डॉ. भापकर यांनी सांगितले. सोडत पद्धतीने देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, गंगाधर गाडे, माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे, नगरसेवक सुरेश इंगळे, कृष्णा बनकर, श्याम भारसाखळे यांची उपस्थिती होती.

पदाधिकार्‍यांची गैरहजेरी
आयुक्त आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील बेबनावामुळे महापौर कलावती ओझा, उपमहापौर संजय जोशी, स्थायी समितीचे सभापती विकास जैन, सभागृह नेता राजू वैद्य आदी पदाधिकार्‍यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. मात्र, आमदार प्रदीप जैस्वाल व संजय शिरसाट आवर्जून उपस्थित होते.

कॉलनीसारखी घरे बांधावीत : आमदार जैस्वाल यांचे मत
प्लॉटधारकांना रमाई योजनेअंतर्गत 2 लाख रुपये देण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांनी एकसारखी घरे दिसतील अशी बांधकामे करावीत, अशी सूचना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी केली. सर्वसाधारण प्रवर्गातील लोकांसाठीही आयुक्त आणि पदाधिकार्‍यांशी चर्चा करून काही मार्ग काढण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. डॉ. भापकर यांनीही आपण अल्पसंख्याक कल्याण विभागाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला असून लवकरच त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त केली.