औरंगाबाद - महिलेला महापौरपद दिले असले तरी पाहिजे तशी साथ मिळत नाही. काम करणा-या महिलेला तिच्या इच्छेनुसार काम करू द्या, अडचणी येत असतील तर जरूर मार्गदर्शन करा, असे सांगत महापौर कला ओझा यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात जाहीरपणे खंत व्यक्त केली. एक महिला संघर्ष करून मनपा सांभाळू शकते तर विधानसभा का सांभाळू शकणार नाही, असा सवाल करीत महिलांना विधानसभेत संधी द्या, अशी मागणीही त्यांनी केली.
शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त आज संत एकनाथ रंगमंदिरात मेळावा घेण्यात आला. या वेळी शिवसेना उपनेते व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, हर्षवर्धन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी ओझा यांनी नेत्यांवर अनपेक्षित बॉम्ब टाकला. त्या म्हणाल्या, आज मनपात मी महापौर आहे, शिवाय आणखी चार महिलांना सभापतिपद देण्यात आले आहे. आम्हा महिलांना मनापासून आमच्या इच्छेनुसार काम करू द्या. मी महापौर झाले पण मला पाहिजे तशी साथ मिळाली नाही. फक्त कामापुरता मान दिला जातो. नंतर बोलण्याकडे लक्षही दिले जात नाही.
खासदारकी का नाही मागितली?
जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिवसैनिक सहकार्य करतात म्हणून महापौर आतापर्यंत काम करू शकल्या असे सांगितले. एकीकडे सहकार्य करत नाही म्हणता आणि दुसरीकडे आमदारकी मागता, असा टोला लगावत दानवे म्हणाले की, आमदारकी छोटी आहे, तुम्ही खासदारकी का नाही मागितली? पण तुम्ही खैरेसाहेबांना काहीच म्हणत नाहीत. या वेळी दानवे यांनी शिवसेनेने विषय समित्यांची सभापतिपदे महिलांना दिल्याचे सांगत महापौरांचा आरोप खोडून काढला. सुहास दाशरथे यांनीही शिवसेनेत महिलांना सन्मानाची वागणूक मिळत असल्याचे सांगितले.
विधानसभेलाही विचार करा
महापौर म्हणाल्या, मनपात महिलांसाठी जागा राखीव असतात तशा पक्षाने विधानसभेतही महिलांसाठी राखीव जागा ठेवाव्या. संघर्षात मनपा सांभाळली, मग विधानसभा सांभाळू शकणार नाही का? जे कार्यकर्ते काम करीत असतात त्यांना न्याय मिळू द्या, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या वाक्यावर सभागृहात ‘महापौरताई आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणा दिल्या गेल्या.
गाफील राहू नका
डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसैनिकांना लोकसभेच्या विजयानंतर सुस्तावू नका, अर्धेच काम झाले आहे, असे सांगत विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहन केले. गाफील राहू नका, पुढचे चार महिने सारे काही विसरून काम करा, असे आवाहन केले. या वेळी शिवसेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
खैरे म्हणाले : लोकांना भेटा, चांगले बोला
खासदार खैरे यांनी भाषणात महापौरांना प्रारंभी कुणीच साथ दिली नसल्याचेही कबूल केले. ते महापौरांना उद्देशून म्हणाले, लोकांना दहा वेळा भेटा, नमस्कार करा, फोन घ्या, चांगले बोला. तुमच्या वॉर्डात निवडणुकीची रॅली काढली तेव्हा लोक नमस्कार करीत खड्ड्याकडे बोट दाखवायचे. नंदकुमार घोडेले यांनी प्रास्ताविक केले, तर राजू वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. गोपीनाथ मुंडे, विलास अवचट, विलास भानुशाली या दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
उद्घाटनप्रसंगी डॉ. अमोल कोल्हे. डावीकडून गजानन बारवाल, किशनचंद तनवाणी, कला ओझा, प्रदीप जैस्वाल, हर्षवर्धन जाधव, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, सुहास दाशरथे, नंदू घोडेले आदी.
छाया : मनोज पराती