आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी काळीपिवळीला शहर बंदीचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सहाआसनी आणि नऊआसनी काळीपिवळी (जीप मिनीडोर) वाहनांना शहरात बंदी घालण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी दिले. मंगळवारी दुपारी १२ वाजेपासून आदेशाची अंमलबजावणी होणार असल्याचे सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी सांगितले.

शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत रिक्षा आणि काळीपिवळी चालकांची मनमानी आणि बेशिस्तपणा यासंबंधी वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या आणि पोलिसांनी केलेला अभ्यास मांडण्यात आला. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ कलम ३३ (१) नुसार हा निर्णय जाहीर केला. जे वाहनचालक या नियमांचे उल्लघंन करतील त्यांच्यावर कलम १३१ नुसार फौजदारी कारवार्इ करण्यात येणार आहे.

सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत ही बंदी असणार आहे. या आदेशावर हरकत आक्षेप असल्यास ६० दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सहायक पोलिस आयुक्त यांचे कार्यालय पैठणगेट किंवा acptraff.abd@mahapolice.gov या ईमेल आयडीवर नाव-पत्त्यासह नोंदवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या वाहनांना असणार सवलत
- आजारी व्यक्तीस रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेली वाहने
- मृत व्यक्तीचे शव शहरात घेऊन येण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी वापरात असणारी वाहने.
- लग्नकार्याच्या वेळी वधू किंवा वरांसाठी वापरण्यात आलेले वाहन.
- शैक्षणिक सहलीसाठी वापरण्यात येणारे वाहन.

या ठिकाणापर्यंतच असेल प्रवेश
- फुलंब्री रस्त्याकडून येणार्‍या वाहनांना हर्सूलपर्यंतच प्रवेश
- जालनाकडून येणारी वाहने चिकलठाण्यापर्यंत येतील.
- बिडकीन-पैठणकडून येणार्‍या वाहनांना महानुभाव आश्रमापर्यंतच मुभा.
- वाळूज, दौलताबाद, वैजापूर मार्गाने येणारी वाहने नगर नाक्यापर्यंतच येऊ शकतील.