औरंगाबाद - शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणार्या काळीपिवळी वाहनांना मंगळवारी प्रथमच शहराच्या हद्दीबाहेर ब्रेक लागला. चिकलठाणा, महानुभाव आश्रम, नगर नाका आणि हर्सूल या चार प्रवेशद्वारांवरच काळीपिवळी वाहने रोखण्यात आली. यामुळे काळपिवळीचालक संतापले. तर दुसरीकडे या वाहनांतून प्रवास करणार्या प्रवाशांना शहराबाहेरच उतरावे लागल्याने त्यांचे हाल झाले. नेहमीच्या भाड्यापेक्षा त्यांना दहा ते पंधरा रुपयांचा अधिक भुर्दंड सोसावा लागला. मात्र, पोलिसांच्या धाकाने एकही काळीपिवळी गाडी शहरात फिरकली नाही.
शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मंगळवारपासून काळीपिवळी वाहनांना शहरात बंदी घालण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी दिले. त्यामुळे काळीपिवळी चालकांना शहराबाहेरील आखून दिलेल्या सीमारेषेवरूनच व्यवसाय करावा लागला. येताना प्रवासी मिळाले; पण जाताना बसस्थानकापासून सात ते दहा किमी थांब्याचे अंतर असल्याने प्रवासी मिळाले नाहीत. परिणामी, दररोजच्या पेक्षा ५०० रुपये व्यवसायात तोटा झाल्याचे वाहनचालक संतोष बुट्टे, बाळू झिने, रामेश्वर क्षीरसागर यांनी सांगितले. याचबरोबर कर्ज घेऊन वाहन खरेदी केले. व्यवसाय होणार नसल्याने कर्जाची परतफेड कशी करावी, कुटुंबाचा उदरनिर्वाह, दैनंदिन गरजा कशा भागवाव्यात, टॅक्सचे हजार ५०० रुपये कसे भरायचे आदी प्रश्न टॅक्सीचालकांनी उपस्थित केले. याकडे सरकारने लक्ष द्यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
साखळी पद्धत फायदेशीर : जेथेकाळीपिवळीची हद्द समाप्त होते तेथे ओळखीच्या रिक्षा बोलवून प्रवासी बसस्थानकापर्यंत सोडण्याचे काम साखळी पद्धतीने पूर्ण करण्यात आले.
काळीपिवळी थांब्याचा अभाव : काळीपिवळी वाहनांना विशेष सीमारेषा आखून देण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास कलम १३१ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे चालकांनी आखून दिलेल्या ठिकाणी हायवे रोडच्या दोन्ही बाजूंना वाहने उभे केली होती. यामुळे ये-जा करणार्या वाहनचालकांना मोठा अडथळा निर्माण झाला होता. वाहतुकीची कोंडी होत होती. नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी काळीपिवळी वाहनांना स्वतंत्र थांबा पार्किंगची व्यवस्था असायला हवी, अन्यथा रस्त्याच्या कडेला उभी असलेली काळीपिवळी वाहनांची रांग मोठ्या दुर्घटनेस जबाबदार ठरेल, अशी भीती काही नागरिकांनी व्यक्त केली.
बसचे प्रवासी वाढणार : कालपर्यंत पैठण येथून औरंगाबादेत यायचे असल्यास काळीपिवळी चालक सिडको, मध्यवर्ती बसस्थानक, मोंढा नाका, एन-७, एन-११, आंबेडकरनगर, पदमपुरा, उस्मानपुरा, क्रांती चौकात आणून सोडत. त्यासाठी ५० रुपये आकारले जात. एसटी बसचे भाडे ६० रुपये होते. आता काळीपिवळी बंद झाल्याने प्रवाशांना ५० रुपये मोजून शहराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचता येईल. तेथून पुढे किमान १५-२० रुपये खर्चून शहराच्या अन्य भागात जावे लागेल. याचा परिणाम पुढील काळात एसटी सेवेवर होऊन प्रवासी संख्या वाढू शकते.
आमच्या कुटुंबांचा विचार करावा : टॅक्सींना शहर बंदीमुळे व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. त्यामुळे तीन हजार टॅक्सीचालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते. तरी
आपल्या आदेशाचा फेरविचार करावा, अशी विनंती निवेदनाद्वारे मंगळवारी मराठवाडा टॅक्सी मेटाडोर अँड जीप ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली. आमच्यामुळे वाहतुकीस अडथळा होत नाही, आम्हाला मराठवाड्यासह शहरातही वाहतुकीचा परवाना दिला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. या वेळी संघटनेचे अध्यक्ष मनमोहनसिंग ओबेरॉय, कैसर खान, अकबर खान, शब्बीर खान, शेख सलीम, सय्यद अजमत, अब्दुल गफ्फार, कुदरत अली यांची उपस्थिती होती.
कडक बंदोबस्तामुळे वाहने फिरकली नाहीत
शहरातकाळीपिवळी थांबतात अशा हर्सूल टी पॉइंट, रेल्वेस्टेशन, नगर नाका, चिकलठाणा येथे कडक बंदोबस्त करण्यात आला होता. या वेळी पोलिस निरीक्षक, आठ पोलिस उपनिरीक्षक, ५० कर्मचारी यांचा चारही पॉइंटवर बंदोबस्त होता. त्यामुळे एकही टॅक्सी दुपारी १२ ते रात्री नऊ या वेळेत शहरात आली नाही.
प्रवाशांची पायपीट
ग्रामीणभागातील प्रवाशांना काळीपिवळी वाहन शोधत जावे लागले. कारण सर्वच बस लहान गावाच्या फाट्यावर थांबत नाहीत. त्यामुळे त्यांना या वाहनांशिवाय पर्याय नसल्याने त्यांची कडाक्याच्या उन्हात चांगलीच पायपीट झाली. रिक्षाचालकांना अधिकचे भाडे मोजावे लागले.
अपंग महिलेची परवड
मौजे अंधेरी येथील ज्येष्ठ महिला गयाबाई सुलताने कामानिमित्त बिडकीनला गेल्या होत्या. आज त्या अंधेरीला परत जाण्यासाठी बिडकीनवरून काळीपिवळीत आल्या. त्यांना महानुभाव आश्रमाजवळच उतरवण्यात आले. अपंगत्वामुळे त्यांना बरोबर चालता येत नव्हते. "दिव्य मराठी' प्रतिनिधीने त्यांना रिक्षात बसवून दिले.