आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kalyan Kale Beat Assembly President Haribhau Bagade

औरंगाबादपाठोपाठ फुलंब्री तालुक्यातील खरेदी-विक्री संघावर ताबा; फुलंब्रीत तर एकतर्फी विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांनी डॉ. कल्याण काळे यांना फुलंब्री मतदारसंघात चीत केले. दोन पराभवांनंतर बागडे यांना ते शक्य झाले होते. मात्र रविवारी झालेल्या तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत डॉ. काळे यांनी फुलंब्री तसेच या मतदारसंघाचा भाग असलेल्या औरंगाबाद तालुका खरेदी-विक्री संघात बागडे यांच्या पॅनलला पराभवाचा धक्का दिला. औरंगाबाद तालुक्यात काँग्रेस आघाडीला काठावरचे बहुमत मिळाले, तर फुलंब्रीत मात्र १७ पैकी १६ जागा पटकावत एकतर्फी विजय मिळवला.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघात फुलंब्रीसह औरंगाबाद तालुक्यातील बहुतांश गावांचा समावेश आहे. त्यामुळे एक प्रकारे डॉ. काळे यांनी पूर्ण मतदारसंघातील ही निवडणूक जिंकल्याचे चित्र आहे. एकूण जागांचा विचार करता ३२ जागांपैकी २५ जागा डॉ. काळे यांच्या पॅनलने खिशात घातल्या आहेत. बागडे यांना शह देण्यासाठी डॉ. काळे यांनी राष्ट्रवादीला सोबत घेत ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. दुसरीकडे बागडे यांनीही यात वैयक्तिक लक्ष घातले होते. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. मतदानाच्या दिवशी बागडे यांनी थेट लाल दिव्याच्या मोटारीतून मतदारांवर दबाव आणल्याचा आरोप रविवारी डॉ. काळे गटाकडून झाला होता. बागडे स्वत: मतदारांना भेटत होते. तसेच मतदानाच्या दिवशीही त्यांनी लाल दिव्याच्या गाडीसह मतदान केंद्रांवर भेटी दिल्या. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. सायंकाळी निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्हीही तालुक्यांतील खरेदी-विक्री संघाचे मतदार काँग्रेस आघाडीसोबत असल्याचे स्पष्ट झाले.

आता बाजार समितीकडे लक्ष
१२जुलैला औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे. यात बागडे तसेच डॉ. काळे यांच्या पॅनलबरोबरच अन्य दोन पॅनलही मैदानात उतरले असल्याने या चौरंगी लढतीत काय होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. बाजार समितीत जर पुन्हा डॉ. काळे यांनी बाजी मारली तर तो बागडेंसाठी मोठा धक्का ठरेल. मात्र जर बागडे यांना ही समिती ताब्यात ठेवता आली तर त्यांची पकड स्पष्ट होईल. थोडक्यात, रविवारी होणाऱ्या या निवडणुकीसाठी बागडे आणखी जोर लावतील यात शंका नाही. या निवडणुकीत डॉ. काळे यांच्यासमवेत त्यांचा पक्षही पूर्ण क्षमतेने नसल्याने एकट्याच्या जिवावर ते किती जागा मिळवतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.