आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐतिहासिक शहरात ‘कमळ’ पुन्हा फुलणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारी एक वास्तू म्हणजे आमखास मैदानाला लागून असलेला कमल तलाव. या तलावात 20 वर्षांपर्यंत कमळ फुलत होते. पर्यटकांचे ते एक आकर्षणही होते. मात्र शहराच्या विकासादरम्यान औरंगाबादकरांनी या तलावाच्या चारही बाजूंनी अतिक्रमणे करून पक्की घरे बांधली. त्यानंतर घरातील कचरा या तलावात टाकण्यास सुरुवात केली. परिणामी कमळ फुलण्याऐवजी कचर्‍याची दुर्गंधी पसरू लागली. 20 एकरांवरील हा तलाव आज अवघ्या 7 एकरांत र्मयादित झाला आहे.
मात्र उशिरा का होईना प्रशासनाला जाग आली. विभागीय आयुक्तांनी बुधवारी या तलावाची पाहणी केली. तलावाचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेने विकास आराखडा सादर करावा आणि जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून देत त्याचा विकास करावा, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.या तलावात भर टाकून अतिक्रमण करण्यात आले आहे. जुनी अतिक्रमणे काढण्याबाबतचा निर्णय होईल तेव्हा होईल, परंतु तोपर्यंत आहे त्या तलावाचे संवर्धन गरजेचे असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
मालकीवरून वाद : या तलावाच्या जागेची मालकी नेमकी कोणाकडे याबाबत एकवाक्यता नाही. तो महापालिका हद्दीत असल्यामुळे मालकी पालिकेकडे असेल असे गृहीत धरण्यात येत होते. मात्र, तलावाची मालकी आमच्याकडे नाही, असे पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांना सांगितले. त्यामुळे पालिका तसेच जिल्हा प्रशासनाने आपापले लेखे तपासून मालकीचा शोध घ्यावा, परंतु मालकीची कागदपत्रे मिळत नसली तरी विकासाचा प्रयत्न थांबवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
औरंगजेब येण्यापूर्वीच होता तलाव : या तलावाबाबत डॉ. शेख रमजान यांनी सांगितले की हा तलाव नेमका केव्हा झाला याची नोंद नसली तरी औरंगजेब या शहरात आला तेव्हा हा तलाव होता. बाजूला राणीचा तलाव, एक पोर्तुगीज चर्च असे वैभव होते. सलीम अली सरोवरातील ओव्हरफ्लो पाणी यात येत असे. तेथे मोठय़ा प्रमाणावर कमळ होते. त्यामुळे याचे नाव ‘कमल तलाव’ असे झाले. हा तलाव रोजाबागपर्यंत पसरला होता. कालौघात अतिक्रमण होत आता तो डबक्यासारखा झाला आहे. व्यवस्थित आराखडा तयार केल्यास येथे पूर्वीप्रमाणेच कमळ फुलू शकतात.