आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मॅग्ना' औरंगाबादेत प्रकल्प सुरू करणार? कॅनडाचे उच्चायुक्त जॉर्डन रिवेज यांची ग्वाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कॅनडातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मॅग्ना औरंगाबादेत उत्पादन प्रकल्प सुरू करण्यास उत्सुक असल्याची ग्वाही कॅनडाचे उच्चायुक्त जॉर्डन रिवेज यांनी सीआयआयच्या शिष्टमंडळाला दिली. दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या कॅनडाच्या शिष्टमंडळाने शहराच्या औद्योगिक प्रगतीचा आढावाही घेतला.
बुधवारी कॅनडाचे उच्चायुक्त जॉर्डन रिवेज हे वाणिज्य आयुक्त किशोर मंदरगी, लुईस लॅकसे यांच्यासमवेत शहरात दाखल झाले. त्यांनी सीआयआयचे (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज) अध्यक्ष संदीप नागोरी यांच्यासह सीआयआयच्या सदस्यांची भेट घेतली. या वेळी सीआयआयचे पदाधिकारी प्रशांत देशपांडे, सुनील देशपांडे, गौतम नंदावत, रमण आजगावकर यांची उपस्थिती होती. कॅनडाच्या उच्चायुक्तांनी औरंगाबाद शहरात होणाऱ्या उद्योजकीय वसाहतीचा आढावा घेतला. त्याचे प्रेझेंटेशन प्रशांत देशपांडे यांनी दिले. त्यानंतर बोलताना उच्चायुक्त जॉर्डन म्हणाले, आमच्या देशातील सर्वात मोठी मॅग्ना ही ऑटो कंपनी औरंगाबादेत सुरू केली जाऊ शकते किंवा लघुउद्योजकांशी काही सुटे भाग निर्माण करण्यास करार करू शकते. त्यासाठी लघुउद्योजकांनी कॅनडात यावे, आमच्या ऑटो कंपन्या पाहाव्यात. औरंगाबादच्या उद्योगाला आमचा अन् आमच्या उद्योगाला औरंगाबादचा हातभार लागून नवीन औद्योगिक अध्याय सुरू करण्याची तयारी त्यांनी दाखवली.

उद्योजक कॅनडात जाणार
जून महिन्यात औरंगाबादच्या लघुउद्योजकांचे शिष्टमंडळ कॅनडाला जाणार असून १४ १५ जून रोजी हा दौरा होणार आहे. यात अनेक करार होण्याची शक्यता आहे, असे सीआयआयचे अध्यक्ष संदीप नागोरी यांनी सांगितले.

शापूरजी पालनजी कंपनीला मिळाले काम
शेंद्राडीएमआयसीच्या पायाभूत सुविधांचे काम शापूरजी पालनजी या कंपनीला मिळाले आहे. या कंपनीच्या वतीने कॅनडातील काही कंपन्या शेंद्रा येथे काम करणार आहेत. त्यामुळे कॅनडाच्या उच्चायुक्तांची ही भेट महत्त्वाची ठरली.

स्किल सेंटर उभारा
आम्ही कॅनडाच्या उच्चायुक्तांना औरंगाबादेत इंडो-कॅनेडियन स्किल सेंटर उभारण्याची विंनती केली. ती त्यांनी मान्य केली असून ते लघु मध्यम उद्योगांसोबत तंत्रज्ञान करार करण्यास उत्सुक आहेत. तेथील मॅग्ना ही मोठी ऑटो कंपनी शहरात येण्यासही त्यांनी दुजोरा दिला. - संदीप नागोरी, अध्यक्ष,सीआयआय
बातम्या आणखी आहेत...