आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांनी मृत युवकाला केले इतर रुग्णालयात रेफर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - तालुक्यातील जैताखेडा येथील युवकाचा शनिवारी (दि. ३) विहिरीत पडून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी त्याला विहिरीबाहेर काढून चिकलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर केले. ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तो युवक केव्हाच मृत झाला असल्याचे सांगितले.

सविस्तर हकिगत अशी की, जैताखेडा येथील युवक गोकुळ कनिराम चव्हाण (२३) हा निमडोंगरी शिवारात एका शेतात ऊसतोड करत होता. शनिवारी (दि. ३) दुपारी हा युवक जवळच असलेल्या विहिरीशेजारी अंघोळीसाठी गेला, मात्र पाय घसरून तो विहिरीत पडला. त्यास ग्रामस्थांनी विहिरीबाहेर काढून चिकलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एस. लांजेवार यांनी त्यास २ वाजून २५ मिनिटांनी तपासून रुग्ण पाण्यात बुडालेला आहे, बेशुद्धावस्थेत आहे, रक्तदाब मिळून येत नाही, हृदयाचे ठोके बंद आहेत असे निदान करून ग्रामीण रुग्णालयात रेफर केले. ग्रामीण रुग्णालयात त्यास ३ वाजता दाखल केले असता डॉ. मनीषा गिते यांनी रुग्णाचा मृत्यू एक ते दीड तासापूर्वीच झाला असल्याचे एेकून रुग्णाच्या नातेवाइकांना आश्चर्य वाटले.

या वेळी नातेवाइकांनी टाहो फोडत जर रुग्णाचा मृत्यू आधीच झाला होता तर चिकलठाण येथील डॉक्टरांनी तेथेच त्याची उत्तरीय तपासणी का केली नाही, जर रुग्णाचा मृत्यू झालेला नव्हता तर तेथे सर्व सुविधा असताना तेथेच उपचार का केले नाही, असा प्रश्न केला.
...त्यामुळे रेफर केले
सदरील रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तो अत्यवस्थ होता. केव्हाही त्याचा जीव जाऊ शकतो अशी त्याची स्थिती होती. त्या वेळी त्याचा मृत्यू झालेला नव्हता. त्यामुळे त्याला रेफर केले. मात्र रस्त्यात त्याचा मृत्यू झाला असेल.
- डॉ. बी. एस. लांजेवार,
वैद्यकीय अधिकारी, चिकलठाण
बातम्या आणखी आहेत...