आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kannad Mla Namdev Pawar In Congress News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कन्नडमधून पवार गेल्याने शिवसेनेच्या ‘पॉवर’ला धक्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गेल्या वीस वर्षांत कन्नड तालुक्यामध्ये शिवसेनेचा पाया मजबूत करणारे माजी आमदार नामदेव पवार काँग्रेसवासी झाले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत खासदार चंद्रकांत खैरे यांना त्याचा फटका बसणार असल्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरू झाली आहे.

पवार यांची तालुक्यात पॉवर असेल यावर कोणाचा सहजासहजी विश्वास बसणार नाही, पण आकडे बघितले की ती दिसून येते. 2004 चे मताधिक्य आणि 2009 चा निसटता विजय यातली आकडेवारी नामदेवरावांचे शिवसेनेत असणे नि नसणे अधोरेखित करते.

2009 च्या निवडणुकीमध्ये खैरेंना 33 हजार मतांनी विजय मिळाला. त्यात एकट्या कन्नडचा वाटा होता 32 हजार मतांचा. हेच पवार आता काँग्रेसवासी झाले आहेत, त्यामुळे याचा फटका युतीला म्हणजेच खैरे यांना बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते, ती त्यामुळेच. पवार एकदाच आमदार होऊ शकले, ते केवळ माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यामुळे. एक मराठी माणूस उद्योग, व्यवसायात आहे म्हणून जोशींनी पवार यांना पाठबळ दिले. जोशी यांची सेनेत चलती असताना पवार यांना तीनदा उमेदवारी दिली गेली. एकदा ते विजयी झाले. जोशींच्या उतरत्या काळातही अन्य कोणी नसल्यामुळे 2009 मध्ये पवार हे उमेदवार राहिले खरे, पण मनसेच्या जादूमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. पवार पराभूत होत असतानाही लोकसभेच्या वेळी सेनेलाच येथून मताधिक्य मिळाले.

फटकळ स्वभाव हा त्यांचा नकारात्मक गुण समजला जातो, पण हाच गुण अनेक वेळा त्यांच्या पथ्याशी पडला. काम होत असेल तर हो, नाही तर नाही अशी काहीशी अजित पवार यांच्या स्वभावाशी मिळतीजुळती स्टाइल कन्नडवासीयांना परिचित झाली होती. त्याच स्टाइलने त्यांनी खैरेंनाही सुनावल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच खैरे यांनी पुन्हा खासदारकी मिळवण्यासाठी स्व. रायभान जाधव यांचे चिरंजीव आणि गतवेळी निसटत्या मताधिक्याने आमदार झालेले हर्षवर्धन जाधव यांना सेनेत घेऊन पवार यांना शह दिला. हे लक्षात येताच पवारांनी काँग्रेस जवळ केली. खैरे यांना ते अपेक्षित होते, नव्हे त्यांनी तसे प्रयत्न जाणीवपूर्वक केले.

एखादा संघ जिंकत असला तर त्यांच्या चुकांची कोणी चर्चा करत नाही, असेच काहीसे खैरेंच्या बाबतीत होत असल्याचे शिवसैनिक म्हणतात. पवार यांचा स्वभाव लक्षात घेता ते विजयी होतील, असे फारसे कोणी म्हणत नाही, पण खैरेंना ते पॉवर नक्की दाखवतील, असे बोलले जाते.