आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नड नगरपालिकेचे मुख्याधिकारी लाच घेताना अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड - नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांना त्यांच्याच कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याकडून 20 हजार रुपयांची लाच घेताना औरंगाबादच्या लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. मोरे यांना त्यांच्याच दालनात 20 हजार रुपये लाच घेताना पकडले हे विशेष.

कन्नड नगरपालिकेत पाणीपुरवठा विभागात चौकीदार म्हणून कार्यरत असलेले मुमताज अली अख्तर अली हे 16 नोव्हेंबर 2009 ते 7 ऑक्टोबर 2010 या कालावधीत आजारी रजेवर होते. या कालवधीतील वेतन मिळावे, यासाठी त्यांनी मोरे यांच्याकडे विनंती अर्ज केला होता. हे वेतन मंजूर करण्यासाठी मोरे यांनी मुमताज अली यांच्याकडे 20 हजार रुपयांची मागणी केली होती. अली यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद येथे तक्रार नोंदवली व मुख्याधिकार्‍यांना 20 हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगरपालिका कार्यालयात सापळा रचला. मुमताज अली यांच्याकडून मोरे यांच्याच दालनात 20 हजार रुपयांची लाच घेताना दुपारी दोनच्या सुमारास रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जून 2011 मध्ये कन्नड नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी रुजू झालेल्या दीपक मोरेंनी सुरुवातीच्या काही दिवसांत कडक भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला. मुख्याधिकारीपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी ते उल्हासनगर येथे प्रभारी सहायक आयुक्तपदी कार्यरत होते. मोरे हे ऑगस्ट 2010 च्या राज्यसेवा बॅचचे अधिकारी असून, त्यांच्या बॅचमध्ये एकूण 87 अधिकारी होते. जानेवारी 2013 पर्यंत त्यातील 14 अधिकार्‍यांवर आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला असून 14 पैकी अनेक अधिकारी निलंबित केले असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. मोरे यांच्या विरोधात सर्वसाधारण सभेत यापूर्वीच बदलीचा ठराव संमत केला होता. या कारवाईमध्ये पोलिस उपअधीक्षक पी. डी.चोपडे, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे, विक्रम देशमुख, रवी शिरसाट, संदीप चिंचोळे, सुनील ढेपाळे, यांचा समावेश होता.