आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगनगरी देणार रोजगाराची संधी; तीन हजार तरुणांना मिळणार रोजगार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड तालुक्याला नवीन वर्षात औद्योगिक वसाहत मिळाली असून पहिल्या टप्प्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. डोंगरी व अादिवासी भागामुळे तसेच उद्योग धंद्यांअभावी अनेक वर्षांपासून कन्नड तालुक्याचा विकास खुंटला होता. परंतु औद्योगिक वसाहत मंजूर झाल्याने तालुक्यातील तीन हजार बेरोजगारांच्या कामाचा प्रश्न मिटणार आहे. तर पैठण, बिडकीनमध्ये होत असलेल्या डीएमआयसीमुळे शहरात फ्लॅट व रो हाऊस घेण्याचा कल वाढला आहे.
कन्नड- केवळ शेती हेच प्रमुख साधन असलेल्या कन्नड तालुक्यास आता होऊ घातलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे विकासाची भुरळ पडली असून त्या राष्ट्रीय महामार्गासोबतच रेल्वे लाइनही प्रस्तावित आहे. तसेच वर्षाच्या अखेरीस औद्योगिक वसाहतीला मिळालेल्या मंजुरीच्या सुखद धक्क्यामुळे तालुक्यातील जनतेच्या आशा दुष्काळी परिस्थितीतही मोठ्या प्रमाणात पल्लवित झाल्या आहेत. त्यातच विविध विभागाचे कार्यालय प्रमुख, अधिकाऱ्यांनी आगामी वर्षात विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवून प्रत्येक योजनेचा लाभ तालुक्यातील तळागाळापर्यंत प्रत्येक लाभार्थीस मिळावा यासाठी आतापासूनच आराखडा नियोजन सुरू केले असल्याने २०१६ हे वर्ष तालुक्यासाठी फलदायी ठरणार अाहे.

आतापर्यंत कन्नड तालुक्यात कोणत्याही प्रकारचे औद्योगिकीकरण झाले नाही, बंद पडलेला सहकार तत्त्वावरचा साखर बारामतीने सुरू केला असून त्या व्यतिरिक्त कोणताही उद्योग तालुक्यात नाही. लहरी निसर्गावर अवलंबून असलेला शेतकरी तीन-चार वर्षापासून दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला असतानाही कर्जबाजारी शेतकरी अपेक्षांवर दिवस कंठीत आहे. तालुक्यात मका, ऊस, अद्रक, कापूस, चिकू, हळद, केळी आदींचे मोठे उत्पादन आहे. सर्व करून पाऊस चांगला, उत्पादन चांगले तेव्हा मालास भाव नाही आणि जेव्हा शेतकऱ्याकडे माल नाही तेव्हा चांगला भाव अशी परिस्थिती प्रत्येक वर्षी दिसून येत आहे. यात फायदा होतो तो साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा. मात्र शेती उद्योग नसल्याने माल निर्यात करावा लागतो, तर अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था असल्याने मालाची हानी, नासधूस होते. किंबहुना खराब रस्त्यांमुळे वाहनेच उपलब्ध होत नाही, पर्यायी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.

जलयुक्तसाठी २९ गावांची निवड
>कृषी विभागाअंतर्गत पंतप्रधान सिंचन योजनेतून ठिबक व तुषार जलसंवर्धन योजना वाटप कार्यक्रम राबवणार, दुधाळ जनावरांना कमी जागेत, कमी वेळेत, कमी खर्चात हिरवा चारा उत्पादन करण्याचे तंत्रज्ञानासाठी योजना राबविणार आहे. तर जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कन्नउ तालुक्यातील २९ गावांची निवड करण्यात आलेली आहे. या गावातच विकास होतील.
-एम.आर. पेंडभाजे, कृषी अधिकारी

वॉटर ऑडिटचा पर्याय
पुरेसे पाणी स्वच्छ पाणी देण्यासाठी नवीन वाढीव हद्दीत दोन पाण्याच्या टाक्या बांधणार आहे. पाण्याचे योग्य प्रमाणात वाटप करण्यासाठी वाटर ऑडिट, एनर्जी ऑडिट, बल्क मीटर बसवणे,अनधिकृत नळजोडणी शोधमोहीम हाती घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.

हागणदारीमुक्तीचा केला संकल्प
>संपूर्ण कन्नड शहर ऑक्टोबर २०१६ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.
-डॉ. विपीन इटनकर, मुख्याधिकारी भाप्रसे

एमआयडीसीमुळे विकास
>एमआयडीसीमुळे मोठ्या प्रमाणात उद्योग उभारणार आहे. भूमिपुत्रांनाच रोजगारास प्राधान्य देण्यात येणार आहे. बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. शेतीपूरक प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी प्रयत्नशील आहे,त्यामुळे शेती उत्पादनास, शेती मालास योग्य भाव मिळणे शक्य होणार आहे.
- हर्षवर्धन जाधव, आमदार

२६ ग्रामपंचायती होणार आयएसओ
>पंचायत समितीअंतर्गत तालुक्यातील १३७ ग्रामपंचायतींपैकी २६ ग्रामपंचायतींचे आयएसओसाठी यापूर्वीच ऑडिट झालेले आहे, त्यांना जानेवारीत आयएसओ प्रमाणपत्र मिळणार आहे. उर्वरित ग्रामपंचायती १६-१७ या वर्षात आयएसओ करण्याचा मानस आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चालू वर्षी AIP मध्ये १८ गावांचा समावेश असून नववर्षात कमीत कमी २५ गावांची निवड करून १०० टक्के शौचालय करण्याचा निर्धार केलेला आहे. इंदिरा आवास घरकुल योजनेचा लाभ उर्वरित लाभार्थीना दिला जाणार आहे. मग्रारोहयो अंतर्गत सिंचनाची कामे सुरू करणार आहे. जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत ३० गावांची निवड केली आहे. त्या गावांत जास्तीत जास्त सिंचनाची कामे हाती घेण्यात येणार आहे. ही सर्व गावे टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न आहे.
- कमल सानप, गटविकास अधिकारी