औरंगाबाद : शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात कराटेचे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींची या महाविद्यालयाचा शिपाई गेल्या पंधरा दिवसांपासून छेड काढून अश्लील हावभाव करत असल्याचा धक्कायदायक प्रकार समोर आला आहे. या त्रासाला कंटाळून मुलींनी हिंमत दाखवत अखेर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. या वेळी विद्यार्थिनींसह महाविद्यालयाचे कर्मचारीही पोलिस ठाण्यात उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शाळा, महाविद्यालयांमध्ये सर्रासपणे होत असलेल्या छेडछाडीविरोधात ‘दिव्य मराठी’ने “माझं शहर सुरक्षित शहर’ अभियान राबवले असून टॉक शोचे आयोजनही केले होते. त्यानंतर शहरातील मुलींची छेडछाडीमुळे होणारी घुसमट समोर आली. अनेक तक्रारी, घडलेले प्रसंग मुलींनी “दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीकडे कथन केले. या अभियानामुळे हिंमत मिळालेल्या मुलींनी गुरुवारी छेडछाडीच्या घटनेची पोलिसांत तक्रार दिली.
विद्यापीठ परिसरातील एका अभियांत्रिकी विद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेली २४ वर्षीय तरुणी याच परिसरात मुलींना कराटेचे प्रशिक्षण देते. त्यात लहान वयोगटातील मुलीही प्रशिक्षण घेतात. गेल्या पंधरा दिवसांपासून महाविद्यालयाचा शिपाई सुनील शिंदे हा एका विद्यार्थ्यासह या तरुण इतर मुलींची छेड काढत होता.
एकटक पाहणे, छेड काढणे, अश्लील इशारे करणे असे प्रकार त्यांनी सुरू केले होते. सुरुवातीला मुलींनीही दुर्लक्ष केले. परंतु सलग पंधरा दिवसांपासून त्यांचा हा प्रकार सुरूच असल्याने अखेर प्रशिक्षण देणाऱ्या तरुणीने इतर मुलींसह गुरुवारी सायंकाळी थेट छावणी पोलिस ठाणे गाठत शिपायाविरोधात लेखी तक्रार दिली.
पोलिसांनीही शिपाई सुनील शिंदे याच्याविरोधात मुलीने तक्रार दिल्याचे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकाराची माहिती कळताच छावणी पोलिस ठाण्यात रात्री मोठा जमाव जमला होता. यात महाविद्यालयाचे कर्मचारी, विद्यार्थीही होते. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.