आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करमाडमध्ये पैशासमोर रक्ताचे नाते पडले थिटे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ‘ना बहन बडी ना भैया, सबसे बडा रुपय्या’ हे गीत सध्या करमाड गावात गुणगुणले जात आहे. त्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. जमीन दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोअरसाठी ताब्यात घेतल्यानंतर मोबदल्यापोटी हाती काही लाखांची रक्कम पडणार, असे दिसताच वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा मिळावा यासाठी सासरी गेलेल्या बहिणींनी आक्षेप नोंदवले आहेत. आपसात तडजोड न झाल्यास 78 शेतकर्‍यांचे 90 कोटी रुपये न्यायालयात जमा करावे लागणार आहेत.

वडिलोपार्जित मालमत्तेत मुले आणि मुलींचा समान वाटा असतो. या कायद्याचे स्मरण येथील मंडळींना अचानक झाल्याने शेतात राबणार्‍याच्या हाती पैसे पडण्याऐवजी नवीनच वाद सुरू झाला आहे. पैशांसमोर बहीण-भावंडांचे नाते फिके पडल्याचे स्पष्ट झाले आहे. मामाला एक कोटी रुपये मिळणार, असे समजताच मुंबईत अभियंता असलेल्या एका भाच्याने ‘मामा, माझ्या आईचा वाटा कुठेय?’असे म्हणत सुटी टाकून औरंगाबादेत तळ ठोकला आहे.

कसण्याची जमीन गेल्यानंतर हाती पडलेल्या पैशांतून कामधंद्याचे नियोजन केलेल्या या मंडळींना बहिणी तसेच सुशिक्षित भाच्यांच्या या पवित्र्यामुळे धक्का बसला आहे. हक्काचा वाटा दिल्याशिवाय कोणालाही पैसे मिळणार नसल्याने काहींनी उपविभागीय अधिकार्‍यांसमोर तडजोड करण्याची तयारी दर्शवली आहे. येथे तडजोड झाली तर पैसे दिले जातील, अन्यथा वादग्रस्त प्रकरणातील रक्कम न्यायालयात जमा करणे बंधनकारक असल्याचे उपविभागीय अधिकारी संभाजी अडकुणे यांनी सांगितले.

भाच्याने मागितला वाटा
वृद्धापकाळाकडे झुकलेल्या बहिणीने रीतीरिवाजाचे भान ठेवत भावाला मिळणार्‍या एक कोटीपेक्षा जास्त रकमेत वाटा घेण्यास नकार दिला. मात्र, तिचा मुंबईत अभियंता असलेला मुलगा प्रवीण गोरे (नाव बदलले आहे) कंपनीत रजा टाकून औरंगाबादेत दाखल झाला. मामाला मिळणार्‍या रकमेत आईचा कायदेशीर वाटा असून मामाला मोबदला देण्यात येऊ नये, अशी रीतसर तक्रार दिली. त्यामुळे मामाचे देयक थांबवण्यात आले. न्यायालयबाह्य तडजोडीसाठी मामा-भाचे उपविभागीय अधिकार्‍यासमोर आले होते. आक्षेप मागे घेण्यास स्पष्ट नकार देत ‘मामा, माझा वाटा मला द्या’ अशी ताठर भूमिका घेतली. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट होणार हे नक्की झाले. अशा प्रकारची 25 प्रकरणे अडकुणे यांच्यासमोर आली होती. मात्र, एकाही प्रकरणात तडजोड झाली नाही.

का होताहेत वाद? : जमीन तशीच असती किंवा शेतकर्‍याने परस्पर कोणाला विकून टाकली असती तर कोणी आक्षेप घेतला नसता. मात्र, येथील शेतकर्‍यांना कोटी-कोटी रुपये मिळणार अशा बातम्या वारंवार प्रसिद्ध झाल्या. शिवाय पैसे देण्याची प्रक्रिया कायदेशीर असल्याने आक्षेप नोंदवणे सोपे गेले. काही शेतकर्‍यांना 10 कोटी रुपये मिळताहेत. त्यामुळे नात्याकडे दुर्लक्ष करून कायद्याचा हक्क समोर आला, असे येथील शेतकर्‍यांचे आणि प्रशासकीय अधिकार्‍यांचेही म्हणणे आहे.

अशी होती परंपरा : मुलीला लग्नात हुंडा तसेच अन्य सामान दिल्यानंतर तिचा वडिलांच्या मालमत्तेत अधिकार नाही, असे गृहीत धरले जाते. सणवार भावाने करावेत एवढीच बहिणीची अपेक्षा असायची. त्यानंतर कोणीही वडिलांच्या मालमत्तेत वाटा मागत नसे. 1982 मध्ये न्यायालयीन निवाड्यानंतर कायदाच झाला असला तरी आजही ग्रामीण भागात वडिलांच्या मालमत्तेत मुली वाटा मागत नाहीत. करमाडमध्येही काही प्रकरणांत ही परंपरा समोर आली आहे.

असे आहे चित्र
>भूसंपादन झालेले शेतकरी :550
> रकमेत वाटा मागितला: 78 बहिणी, भाचे
> वाटप बाकी:141 कोटी
> करमाडच्या शेतकर्‍यांना आतापर्यंत वाटप झालेली रक्कम : 150 कोटी
> वादग्रस्त प्रकरणातील रक्कम :अंदाजे 78 कोटी

कायदा काय म्हणतो? : हिंदी सक्सेशन अँक्ट कलम 29 (अ) नुसार वडिलोपार्जित मालमत्तेत मुलगा आणि मुलगी यांचा समान हक्क आहे, असे अँड. गजेंद्र शिर्सीकर यांनी सांगितले.
.
..तर रक्कम देऊ
मोबदल्याच्या रकमेवर आक्षेप घेण्याची प्रकरणे आमच्याकडे आली आहेत. त्यांच्यात तडजोड झाली तरच रक्कम दिली जाईल, अन्यथा नियमानुसार ही रक्कम न्यायालयात जमा केली जाईल. संबंधितांना दिवाणी दावा करावा लागेल. त्यात प्रशासनाची काहीही भूमिका नाही.
-संभाजीराव अडकुणे, उपविभागीय अधिकारी