आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करमाडचे शे‍तकरी होणार करोडपती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डीएमआयसीसाठी जमीन देणारे करमाडचे 552 शेतकरी लखपती, करोडपती होणार असून या पैशातून घर, गाडी घेण्याचे तसेच व्यवसाय सुरू करण्याचे आराखडे त्यांनी तयार केले आहेत. मे महिन्यामध्ये जेव्हा 291 कोटी रुपयांची रक्कम शेतकर्‍यांच्या हातात खुळखुळेल, त्यानंतर करमाडकरांचे नशीब पूर्णपणे पालटणार आहे. आलेली लक्ष्मी या गावाचेही रुपडे पालटून टाकणार आहे.

डीएमआयसी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प औरंगाबादकरांचे भविष्य पालटणार आहे. त्याची सुरुवात करमाडपासून होऊ घातली आहे. या भागातील 550 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून एकरी 23 लाख रुपयांच्या दराने मोबदला दिला जाणार आहे. हा पैसा मे महिन्यात शेतकर्‍यांना मिळणार असल्याने आता त्या पैशाच्या विनियोगाचे प्लॅनिंग सुरू झाले आहे. औरंगाबाद - जालना रोडवरचे गाव ही करमाडची ओळख आता बदलणार आहे. डीएमआयसीमुळे हे बदल होऊ घातले आहेत. गावातील शेतकर्‍यांच्या हाती पैसा येणार आहे. भविष्याचा, मुलाबाळांचा विचार करून तो कसा वापरता येईल, यावर सध्या घराघरांत चर्चा सुरू आहे.

शेंद्रा भूसंपादनावेळी काय झाले ?

काही वर्षांपूर्वी शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या पहिल्या टप्प्याच्या भूसंपादनानंतर काही कुटुंबे अचानक आलेल्या लक्ष्मीने गांगरून गेली होती. चैनीवर खर्च करीत मौजमजा केली, पण आली तशी लक्ष्मी गेली. भविष्यातील जीवनाचे नियोजन त्यांना करताच आले नाही. हे ताजे उदाहरण डोळ्यांसमोर असल्याने करमाडकरांनी आता नियोजन केले आहे. ‘दिव्य मराठी’ने काही शेतकर्‍यांशी या विषयावर गप्पा मारल्या तेव्हा त्यांनी आपल्या योजना सांगितल्या.

करमाडचे म्हटले की वाढवतात भाव

बहुतेक शेतकरी गेलेल्या जमिनीऐवजी पुन्हा जमीन घेणार आहेत. काहींनी सौदेही करून ठेवले आहेत. करमाडजवळ जमिनीचे भाव वाढल्याने जिल्ह्यात किंवा शेजारच्या जालना जिल्ह्यात जमिनी घेण्याच्या हालचाली आताच सुरू झाल्या आहेत. करमाडचे उपसरपंच कैलास उकिर्डे म्हणाले की, काही शेतकर्‍यांनी सरकारकडून पैसा याच महिन्यात येणार आहे असे गृहीत धरून इसारपावतीही केली, पण आता पैसे द्यायला विलंब झाल्याने पैसे बुडाल्यासारखेच आहेत. मात्र, शेतकरी जमिनीच्या बदल्यात जमीनच घ्यायला बघतो आहे. डॉ. जिजा कोरडे म्हणाले की, इतरत्र जमीन घ्यायला गेलो की करमाडचे म्हणून भाव वाढण्याचीही भीती आहे.
असे झाले मालामाल!
नाव : सखाराम तारू जमीन : 18 एकर (चुलत्यासह) मोबदला : 4 कोटी 14 लाख रुपये अंदाजे काय करणार? : प्लॉट घेऊन उद्योग आणि वेअरहाऊसचा व्यवसाय सुरू करणार
नाव : दामोदर कुलकर्णी जमीन : 6 एकर 8 गुंठे मोबदला : 1 कोटी 56 लाख रु. अंदाजे काय करणार? : बँकेत पैसे ठेवून घर बांधणार

नाव : किसनराव कुलकर्णी जमीन : 5 एकर मोबदला : 1 कोटी 15 लाख रु. अंदाजे काय करणार? : व्यवसायात मदत, बँकेत ठेवणार
नाव : राहुल सुरेश कोरडे जमीन : 8 एकर मोबदला : 1 कोटी 84 लाख रु. अंदाजे काय करणार? : पोल्ट्री फार्म काढणार, हार्डवेअरचे दुकान सुरू करण्याची इच्छा

नाव : गणेश आत्माराम तारू जमीन : 7.5 एकर मोबदला : 1 कोटी 72 लाख 50 हजार रु. अंदाजे काय करणार? : हॉटेल सुरू करणार, शिवाय घर बांधणार
नाव : बबन कुलकर्णी जमीन : 2 हेक्टर 11 आर मोबदला : 1 कोटी 19 लाख रु. अंदाजे काय करणार? : मुलांच्या व्यवसायाची सोय करणार, घर बांधणार

नाव : जगन्नाथ तारू जमीन : 2.5 एकर मोबदला : 57 लाख 50 हजार अंदाजे काय करणार? : बांधकाम व्यवसाय सुरू करणार
नाव : डॉ. जिजा कोरडे जमीन : 55 एकर (चार भावांत) मोबदला : 12 कोटी 65 लाख रु. अंदाजे काय करणार? : इतरत्र जमिनी घेणार, गुंतवणूक
कोण काय करणार ?
गाड्या घेण्याचे स्वप्न
उपसरपंच कैलास उकिर्डे म्हणाले की, आता करमाडमध्ये दोनशेच्या आसपास वाहने आहेत. मोबदल्याचे पैसे आल्यावर आणखी 100 तरी गाड्या वाढणारच. राहुल कोरडे तर चार-पाच लाखांची गाडी घेणार आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुरेंद्र साळुंके म्हणाले की, करमाडमधील नागरिक चांगल्या भविष्यासाठी पैसा वापरू इच्छितात हे चांगले आहे.

वेटर थाटणार स्वत:चे हॉटेल
हॉटेलात दीड दोन हजारांवर काम करणार्‍या 17 वर्षांच्या गणेश आत्माराम तारू या तरुणाची साडेसात एकर जमीन डीएमआयसीमध्ये जात आहे. सातवीनंतर शिक्षण सोडून तो एका हॉटेलात सात वर्षांपासून काम करतो. त्याला आता स्वप्न साकार करायचे आहे. गणेश आगामी काळात हॉटेलमालक होणार आहे.

तारू उतरणार ‘रिअल इस्टेट’मध्ये
साठीतील जगन्नाथ तारूबांधकाम व्यवसायात उतरणार आहेत. तर बबन कुलकर्णी यांना मुलांसाठी व्यवसाय सुरू करायचाय. पोस्टमास्तर किसनराव कुलकर्णी यांना मुलाच्या बिअर शॉपीचा विस्तार करून बिअर बार काढायचाय. 19 वर्षांच्या राहुल कोरडेला पोल्ट्री फार्म काढायचा आहे. सखाराम तारू वेअरहाऊसच्या व्यवसायात उतरतील. दामोदर कुलकर्णी पैसा बँकेत ठेवतील.

घरे बांधून खोल्या भाड्याने देणार
जमिनीचा पैसा आल्यावर छोट्या घरात राहणार्‍यांना मोठी घरे बांधायची आहेत. करमाडचे झपाट्याने शहरीकरण होणार आहे. अशा परिस्थितीत आलेले पैसे खर्च करून मोठे घर बांधायचे. एका भागात राहून उरलेल्या खोल्या भाड्याने द्यायच्या असे प्लॅनिंग बहुतेकांचे आहे. काही जण गाळे काढून भाड्याने देतील.