आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कटकट गेट रुग्णालयाचे रुपडे पालटणार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आम्हीच खरे वाघ, असा दावा करत एमआयएमला आम्ही घाबरत नाही, असे म्हणणाऱ्या शिवसेनेने शहरात नव्याने दाखल झालेल्या या नवख्या पक्षाची धास्ती घेतल्याचे दिसून येते. याला धास्ती म्हणा किंवा वाद, यामुळे पालिकेच्या कटकट गेट येथील ‘ख्वाजा गरीबनवाज’ या रुग्णालयाचे नशीब मात्र फळफळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एमआयएमकडून हैदराबाद येथे अत्यल्प शुल्कात आरोग्य सेवा पुरवली जाते. त्यांची तेथे मोठी रुग्णालये आहेत. त्याच धर्तीवर पक्षाने औरंगाबादेतही ही सुविधा पुरवण्याचे ठरवले. त्यासाठी जागेचा शोध घेताना तातडीने ओपीडी सुरू करण्यासाठी पालिकेचे कटकट गेट येथील हे रुग्णालय भाडेतत्त्वावर देण्याची रीतसर मागणी केली होती. तसा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला होता. या परिसरात गरिबांची संख्या जास्त असल्याने तेथे सुविधा देता यावी, हा त्यामागचा उद्देश होता.

१५ ऑगस्टला पालकमंत्री कदम शहरात आले तेव्हा त्यांच्या कानी ही बाब गेली. तेव्हाच त्यांनी या रुग्णालयाची पाहणी केली. परिसर स्वच्छ केला. रुग्णालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली असली तरी परिसर चांगला आहे, मोकळी जागा आहे. ही जागा एमआयएमच्या ताब्यात जाणे योग्य नाही, असे त्यांनी तेव्हाच पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. एमआयएमला ही जागा देण्याऐवजी तिचा विकास केला तर उत्तम असे त्यांनी स्पष्ट केले. तेव्हा जिल्हा नियोजन मंडळाकडून कोटी रुपये देण्याचे निश्चित केले.

आ. इम्तियाज यांना दालनात बोलावून घेतले
जिल्हानियोजन मंडळातून कोटी रुपये या रुग्णालयाला देण्याचे स्पष्ट झाल्यानंतर कदम यांनी आमदार इम्तियाज यांना आपल्या दालनात बोलावून घेतले या निर्णयाची माहिती दिली. तुमच्या पक्षाला देणार नाही, पालिकाच ते चांगले चालवेल, असे आवर्जून सांगितले. शिवसेनेनेही एक रुग्णालय चालवावे, अशी सूचना इम्तियाज यांनी केली. मात्र कदम यांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे इम्तियाज यांनी सांगितले.

यात कसले राजकारण ?
संघटनेला पालिकेची इमारत देण्याचा प्रश्नच नव्हता. तिजोरीत पैसे नसल्याने पालकमंत्र्यांकडे तशी मागणी केली होती. यात कसले राजकारण? त्र्यंबक तुपे, महापौर.

भाडेतत्त्वावर मागितले होते
गरीब रुग्णांना चांगली आरोग्यसेवा देता यावी, यासाठी पालिकेने दुर्लक्षित केलेले हे रुग्णालय भाडेतत्त्वावर मागितले होते. परंतु पालकमंत्र्यांनी नकार दिला. आता आम्हाला अन्य जागा शोधावी लागेल. इम्तियाज जलील, आमदार,एमआयएम.