आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कटकटगेट रस्त्याचा प्रश्न वीस वर्षांनंतर निकाली! दरराेज ६० हजार वाहन-चालकांचा प्रवास सुखद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या २० वर्षांपासून चर्चेत असलेला कटकटगेटलगतच्या रस्त्याचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. गेटला लागून असलेल्या ११ मालमत्ताधारकांनी टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) घेण्यास मान्यता दिल्याने मंगळवारी त्यांची बांधकामे हटवली जाणार आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजता पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते रस्ता कामाचे भूमिपूजन होणार आहे. हे काम मार्गी लावण्यात आमदार इम्तियाज जलील यांनी महत्वाची भूमिका बजावली.

चंपा चौक, चेलीपुरा, एसटी कॉलनीतून सिडको पोलिस मेसकडे जाण्यासाठी कटकटगेटमधून जाणारा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. येथून दररोज सुमारे ६० हजार वाहनचालक ये-जा करतात. त्यांना दररोज कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे गेटच्या दोन्ही बाजूंनी पूल आणि रस्ता करावा, अशी मागणी २० वर्षांपासून केली जात होती. मात्र, मालमत्ताधारक टीडीआर घेण्यास तयार नव्हते. शिवाय निधी उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात होते. सदरील गेट मुस्लिमबहुल वसाहतीत असल्याने मनपा प्रशासनही गांभीर्याने पाहत नव्हते.
वर्षभरापूर्वी आमदार इम्तियाज यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री रामदास कदम यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. राजकारण बाजूला ठेवून विकास कामासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली. ती कदम यांनी मान्य करत जिल्हाधिकारी निधी पांडे, मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना निर्देश दिले. नागरिकांनी मनपाकडे जागेच्या बदल्यात रोख रकमेची मागणी केली होती. मात्र मनपाने त्यास नकार दिला होता. मग आमदार इम्तियाज यांनी प्रत्येक मालमत्ताधारकाची भेट घेऊन हा रस्ता झाल्यास संपूर्ण भागाचा विकास होईल. टीडीआरच्या रुपाने तुम्हाला रक्कम मिळेलच, अशी समजूत घातली. गेल्या दोन दिवसांत या दिशेने वेगवान हालचाली झाल्या. सोमवारी निसार खान, परवीनबी, सलमा बेगम, सईदा बेगम, शमीम खान यांना तत्काळ टीडीआर दिला असून एकाच्या अर्जाची तपासणी सुरू आहे. दोघांचे एफएसआय तर अन्य दोघांचे टीडीआरसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यांनाही तत्काळ सुविधा देण्यात येणार आहेत.

दरम्यान, कटकट गेट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन बुधवारी पालकमंत्री कदम यांच्या हस्ते होणार आहे. आयुक्त बकोरिया यांनी यांत्रिकी आणि अतिक्रमण विभागाला अकरा मालमत्ता पाडण्याचे आदेश सोमवारी दिले. त्यानुसार सकाळी नऊ वाजता ही मोहीम सुरू होईल. टीडीआर देण्याच्या प्रक्रियेत बकोरिया यांच्यासह नगररचना विभागाचे प्रभारी ए. बी. देशमुख, सहायक संचालक नगररचनाचे जयंत खरवडकर, शाखा अभियंता अकलाख सिद्दिकी यांनीही पुढाकार घेतला.
वर्षभरात पूल, रस्ता
पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होताच कामाला प्रारंभ होणार आहे. वर्षभरात या रस्त्यावरून हजारो वाहनधारक सुखद प्रवास करू शकतील. या कामाकरिता डीपीसीतून दोन कोटी ९५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निधी वितरणात कोणताही अडथळा येता कामा नये, असे पालकमंत्र्यांनी प्रशासनाला बजावले.
विकास होणे महत्त्वाचे
निवडणूक पाच वर्षांनी होते. मधल्या काळात लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून विकासाचे काम करणे सर्वच जाती-धर्माच्या लोकांना अपेक्षित आहे. तेच काम मी केले आहे. यामुळे सिडको आणि शहरातील लोकांना मोठा फायदा होईल. इम्तियाज जलील, आमदार
बातम्या आणखी आहेत...