औरंगाबाद - हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणा-या केबीसीचा भंडाफोड करणारा अहवाल औरंगाबाद सीआयडीने फेब्रुवारीमध्ये दिला होता. मात्र, त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही, अशी माहिती गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक आयुक्त अविनाश आघाव यांनी दिली.
‘केबीसी’च्या संचालकांनी मराठवाड्यातील जनतेलाही कोट्यवधींचा गंडा घातला आहे. आघाव यांनी सांगितले की, राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या वतीने या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार आणि उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार पूर्ण चौकशी करून अहवाल दिला गेला. बीड बायपास परिसरात गुरू लॉन्सवर हा भव्य कार्यक्रम पार पडला होता. गुंतवणूकदार व एजंटांचा मेळावा व गुणगौरव सोहळा असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. कंपनीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गाड्या आल्या होत्या. या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंगदेखील करण्यात आले होते. औरंगाबाद विभागाने केलेला अहवाल नाशिकला देण्यात आला होता. त्यानंतर मार्चमध्ये नाशिकमध्ये केबीसीवर गुन्हा दाखल झाला.
पैठणच्या ग्रामस्थांचे ‘केबीसी’त 200 कोटी
पैठण तालुक्यातील सुमारे दोनशे कोटींची गुंतवणूक केबीसीत असल्याची चर्चा आहे. गुंतवणूकदारांच्या रोषाला घाबरून एजंटही बेपत्ता आहेत. लोहगाव येथील बबन घुले (पेंटर) यांनी केबीसीमध्ये गुंतवणूक केली होती. पॉलिसीची मुदत संपत आल्याने मोठी रक्कम मिळणार या आशेवर घुले यांनी घर बांधण्यास काढले होते. परंतु पॉलिसीचे पैसे काही मिळाले नाहीत.
आरोपी पोलिसासह तिघांना कोठडी, बँक खात्यावरील 24 कोटी जप्त
हजारो गुंतवणूकदारांना कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या केबीसी संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण यांचा मेहुणा पोलिस कर्मचारी संजय जगताप याच्यासह तिघांना बुधवारी न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान, चव्हाण पती-पत्नीच्या बॅँक खात्यातील 24 कोटी रुपये गोठवण्यात आले असून दोन दिवसात दहा कोटींची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. या घोटाळाप्रकरणी मुख्य संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण, आरती चव्हाण यांच्यासह त्यांचे भाऊ, एजंट, कर्मचा-यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आतापर्यंत चव्हाण याचा भाऊ बापूसाहेब व मॅनेजर पंकज शिंदे, कारचालक नितीन शिंदे व पोलिस कर्मचारी संजय जगताप,नानासाहेब चव्हाण, वहिनी साधना बापू चव्हाण यांना अटक केली आहे.
आजवर 40 कोटी जप्त
पोलिसांनी सुरुवातीला केबीसी कार्यालयाच्या झडतीत 4 कोटी जप्त केले. त्यानंतर 10 जून रोजी भाऊसाहेब चव्हाण व आरती यांना अटक केली. त्यापूर्वीच चव्हाण कुटुंबीयांची बॅँक खाती गोठवण्यात आली आहेत. या सर्वांची मिळून एकूण 40 कोटींची मालत्ता जप्त करण्यात आली आहे.