आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीचे लग्न थांबवले, घर विकले, पैसे मिळतील ना ? पोलिसांच्‍या कारवाईकडे लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अल्पावधीत दामदुप्पट मिळवण्याच्या आशेपोटी केबीसीमध्ये लाखोंची रक्कम गुंतवणार्‍यांनी गुरुवारी पोलिस आयुक्तालयात कंपनीविरोधात तक्रार देण्यासाठी रीघ लावली. केबीसीत गुंतवणूक केल्यामुळे ऊस तोडणी करून मुलीच्या लग्नासाठी पै-पै जोडलेली रक्कम, घर विकून जमवलेले पैसे, मुलाच्या भविष्यासाठी केलेली आर्थिक तरतूद सर्व काही नाहीसे झाले. परतावा मिळाला नाही तरी चालेल. पण गुंतवलेली रक्कम तरी परत मिळेल का? असा आर्त सवाल गुंतवणूकदारांनी नाशिकच्या पोलिस पथकाला केला. केबीसी गैरव्यवहाराचा तपास पथकाकडे अर्ज सादर करण्यात आले. त्यामध्ये बहुतांश ठेवीदार श्रमिक, कष्टकरी वर्गातील लोक आहेत.
एमआयडीसी वाळूज परिसरातील रहिवासी रामेश्वर चव्हाण हे एक वर्षांपूर्वी लष्करातून निवृत्त झाले. निवृत्तीतून मिळालेले 1 लाख 36 हजारांची रक्कम त्यांनी पत्नी गोदाबाई चव्हाण यांच्या नावानी गुंतवली. मुलगा योगेश सध्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून त्याला भविष्यात पैसे लागतील म्हणून ही सुरक्षित गुंतवणूक ठरेल, असा त्यांना विश्वास होता. पण त्यांचा घात झाला. आता अभियांत्रिकीच्या दुसर्‍या वर्षात शिकणार्‍या योगेशने स्वत:च अर्ज लिहून दिला.
विहामांडवा येथील ऊस तोडणी कामगार पांडुरंग आंधळे यांनी काबाडकष्ट करून मुलीच्या लग्नासाठी अडीच लाख रुपये जमा केले. पै- पै जोडताना अनेक इच्छांना मुरड घालून त्यांनी ही रक्कम जमा केली होती. केबीसीमार्फत अडीच लाखांवर दुप्पट परतावा मिळेल तेव्हा मुलीचे थाटात लग्न करू, असे स्वप्नही त्यांनी पाहिले. फसवणूक झाल्यामुळे आता काय करावे हे त्यांना कळेनासे झाले आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर पैसे परत मिळतील ही आशा त्यांना आजही लागून राहिली आहे.
एमआयडीसी वाळूज परिसरातील नारायणगाव येथील सधन शेतकरी बाबासाहेब कडुबा बनकर यांनी 30 लाख रुपये गुंतवले. भविष्यासाठी त्यांनी या पैशाची तरतूद करून ठेवली होती, परंतु दुप्पट रक्कम मिळेल या आशेपोटी केबीसीला पैसे सुपूर्द केले. आपण लुबाडले गेलो आहोत हे कळाल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. गुंतवलेले पैसे परत कसे मिळतील, यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यांनीही केबीसीविरोधात गुरुवारी आयुक्तालयात तक्रार दिली.
पैठण तालुक्यातील पाचोड गावाच्या परिसरातून 1 कोटी 75 लाखांची वसुली करणारे एजंट सय्यद नजावत यांनीही तक्रारकर्त्यांसोबत गुरुवारी आयुक्तालय गाठले. भामट्याने आपल्याला अब्जाधीश होण्याचे स्वप्न दाखवले होते. त्यांच्या स्वप्नरंजनाला बळी पडून आपण पाचोड परिसरातील शेतकर्‍यांकडून 1 कोटी 75 लाखांची वसुली करून केबीसीला दिले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आलेल्यांना आपण घर, शेती विकून 27 लाख रुपये परत केल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
केबीसी घोटाळ्याची शक्यता ‘दिव्य मराठी’ने एका वृत्तात 3 महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही अन् फसत गेल्याची भावना आपेगावचे (ता.पैठण) निवृत्ती औटी यांनी व्यक्त केली. शेती व्यवसायातील नफ्याचे दहा लाख केबीसीत गुंतवले. मात्र, कधीही मला परतावा मिळाला नाही. ‘दिव्य मराठी’चे मी आभार व्यक्त करतो, त्यांनी हे वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे मागील तीन महिन्यांत फसणार्‍यांची संख्या कमी झाल्याचे त्यांनी म्हटले.