आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल करण्यावरून मतमतांतरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केबीसी घोटाळा करणारे संचालक भाऊसाहेब चव्हाण यांच्याप्रमाणे औरंगाबादेतील एजंटवर गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. पण तक्रार आलीच तर आम्ही शहानिशा करून कारवाई करू, असेही त्यांनी म्हटले. ठेवीदारांची येथे फसवणूक झाल्यामुळे येथेही गुन्हा दाखल करणे गरजेचे असल्याचे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. विष्णू ढोबळे यांनी स्पष्ट केले आहे. कोट्यवधी रुपयांना गंडवणा-या एजंटवर कारवाईसंदर्भात पोलिस आणि विधिज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत.

नाशिक येथील आडगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आर. डी. गवळी यांच्या नेतृत्वातील तीनसदस्यीय पथकांसमोर 978 ठेवीदारांनी गा-हाणे मांडले आहे. ठेवीदारांपैकी बहुतांश जणांनी एजंटने फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी पथकाकडे एजंटवर गुन्हा दाखल करण्याची तोंडी मागणी केली आहे. यासंदर्भात पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांना विचारले असता त्यांनी येथे गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे म्हटले आहे. नाशिक येथे गुन्हा दाखल असून तेथील पोलिस स्वतंत्रपणे तपास करत आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करत आहोत. एजंटवर कारवाईसंदर्भात सध्या विचार नाही. मात्र जर कुणी तक्रार घेऊन आल्यास आम्ही तपास करून योग्य कारवाई करण्यास तयार असल्याचेही सिंह यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ विष्णू ढोबळे यांनी मात्र आयुक्तांच्या भूमिकेचे खंडन केले असून गुन्हा येथे घडला तर येथेच दाखल करावा लागेल, असे म्हटले आहे. अ‍ॅड. दुष्यंत कल्याणकर यांनीही येथे गुन्हा दाखल करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. एकाच एजंटवर दोन ठिकाणी गुन्हे दाखल करता येणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.