आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीनच तासांत कॅनॉट चकाचक, शालेय विद्यार्थ्यांनीही काढली स्वच्छतेवर आधारित चित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सहकारातून समस्येची मुक्ती किती सहजपणे होऊ शकते, याचा प्रत्यय रविवारी कॅनाॅट परिसरात आला. कॅनाॅट व्यापारी संघटना आणि त्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी स्वत: कचरा वेचून उद्यानासह तो परिसर स्वच्छ केला. आता दर रविवारी स्थािनक नागरिक आणि व्यापारी एकत्र येऊन परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवतील, असा संकल्पही यावेळी करण्यात आला.
‘सहकारातून समस्यामुक्ती‘या मोहिमेत ‘दिव्य मराठी’ने परिसरातील उद्याने स्वच्छ करण्याचे आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी लोकसहभाग वाढवण्याचे आवाहन मागच्या सोमवारी केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कॅनाॅट व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिडको उद्यानापासून सुरुवात करण्याची तयारी दाखवली. त्याला स्थािनक नागरिकांच्या सहभागाने अवघ्या तीन तासात मूर्त स्वरूप आले. ‘दिव्य मराठी’चा संपादकीय चमूही या कामात सक्रिय सहभागी झाला होता.
तासाभरात उद्यान स्वच्छ
रविवारी सकाळी ९ वाजता या उपक्रमाचा प्रारंभ झाला. नगरसेवक प्रशांत देसरडा, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खर्डे, संतोष मुथा, ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक दीपक पटवे यांनी भूमिका मांडली. त्यात हा उत्साह असाच टिकवून ठेवण्याचे आवाहन व्पापारी आणि स्थािनक रहिवाशांना करण्यात आले. त्यानंतर उपस्थित अाबालवृद्धांनी मास्क व हॅण्डग्लोब्ज घालत स्वच्छतेला प्रारंभ केला. तासाभरात सिडको उद्यान स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा वळाला उद्यानाच्या बाहेरच्या परिसराकडे. दुकाने, रस्ता आणि काही मोकळ्या जागा इथे पडलेला कोरडा कचरा या सहभागी स्वयंसेवकांनी उचलला तर अन्य कचरा उचलण्यासाठी महापािलकेचे एक स्वच्छता पथक कार्यरत झाले. त्यामुळे तासाभरात संपूर्ण कॅनाॅट परिसराचे रुपडेच पालटले. हे बदललेले रूप पाहून परिसरातील रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी दर रविवारी हे काम करण्याचा संकल्प जाहीर केला.
दारूच्या बाटल्या, पाऊच, रॅपर अन् गुटख्याच्या पुड्या : उद्यानाची स्वच्छता करताना दारूच्या रिकाम्या बाटल्या, पाण्याचे िरकामे पाऊच, गुटखा पुड्या आणि प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर निघाला. या उद्यानात काही लोक केवळ व्यसन करण्यासाठी येतात, या तक्रारीला त्यामुळे पुष्टीच मिळाली. अशा व्यक्तींना पकडून देण्यासाठी पुढाकार घेण्याचा संकल्प व्यापारी आणि रहिवाशांनी केला, तर अशा लोकांची छायाचित्रे वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली जातील, असे ‘दिव्य मराठी’तर्फे जाहीर करण्यात आले.
सीआरटीने दिली शास्त्रशुद्ध माहिती :
सायंकाळी ५ वाजता कॅनॉट परिसरातील एका सभागृहात सीआरटी टीमच्या सनवीर छाबडा, गौरी मिराशी व स्नेहा बक्षी यांनी स्लाइड शोद्वारे कचरा वर्गीकरणाची शास्त्रशुद्ध माहिती दिली. कचरा गोळा करतानाच त्याचे कसे वर्गीकरण करावे, ओला-सुका कचरा नेमका कोणता, जो कचरा विकला जातो त्यातून गरीब महिला कसे पोट भरू शकतात याची फोटोसह माहिती दिली.

व्यापारी संघाकडून श्रमपरिहार :
या अभियानात शेकडो हात सहभागी झाल्याने कॅनॉट व्यापारी संघ व नागरिक आनंदित होते. त्यांनी अभियानानंतर सर्व स्वच्छतादूतांना नाष्टा दिला. ज्ञानेश्वर खर्डे, अनिल सालोमन, संतोष मुथा, योगेश झवेरी, तुकाराम नन्नावरे, विवेक येवले, नारायण पारटकर, दीपक जैन, सागर सारडा, संतोष खर्डे, समीर शिवानी, अरुण मंगरुळे, नंदू कवरे, देवेंद्र जावळे, प्रमोद नगरकर, गोपाळ खंडेलवाल, राजू वासवानी, भावेश रंगवाणी, राम दाभाडे, राजू गुरव, कल्पना गुरव, ज्ञानेश्वर पतंगे, विवेक सुसलादकर, लक्ष्मण दहिहंडे, प्रवीण गुंजरगे, पंकज मंत्री यांच्यासह अनेक व्यापारी, तर महिलांत स्वाती स्मार्थ, लता गुंजरगे, उज्ज्वला अवघड पाटील, वैशाली येवले, मीनाक्षी डायगव्हाणे, कांता खंडेलवाल, वर्षा पोहेकर, अंजली गोरे, वृषाली चव्हाण महावितरणच्या सहायक महाव्यवस्थापक सौ. भाले यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.
गरवारे कम्युनिटी सेंटरचे सुनील सुतवणे यांच्यासह पथनाट्यातील सर्व मुलेही अभियानात सहभागी झाली होती.

सीसीटीव्ही लावणार
कॅनाॅट गार्डनमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्याने व्यापाऱ्यांनी बंद सीसीटीव्ही दुरुस्त करून काही नवे कॅमेरे या परिसरात बसवण्याचा निर्णय घेतला.

कचराकुंड्या देणार
कचरा वेचक महिला उद्योजक आशाबाई डोके आपल्या टीमसह आल्या होत्या. त्यांनी प्लास्टिक, बाटल्यांसह विकला जाणारा कचरा वेचून नेला. पुढच्या वेळी हा कचरा वेगळा करून देण्याची संकल्पना सीआरटी टीमच्या स्नेहा बक्षी, गौरी मिराशी यांनी मांडली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठे ३५ डस्टबिन देण्याचा संकल्प केला. यात संतोष मुथा, ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, योगेशभाई झवेरी, तुकाराम नन्नावरे, नायर गंगवाल, सागर सारडा यांचा समावेश आहे.
गाडगेबाबा अन् चित्रकारांमुळे रंगत
सकाळी आठच्या ठोक्याला खंडूजी गायकवाड गाडगेबाबांच्या वेशभूषेत हजर झाले. हाती झाडू घेऊन त्यांनी "गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला' या भजनाला "स्वच्छ करूया गार्डनला' अशी साद देत सर्वांचा उत्साह वाढवला. याच वेळी सायकलवर ज्युनिअर चार्लीची एन्ट्री झाली. त्याने मूक अभिनयातून कचरा करू नका असा संदेश दिला. मुलांसाठी चित्रकार कैलास घुले, त्यांच्या पत्नी आश्विनी घुले, प्रतीक वासनकर, उमेश पवार यांनी उद्यानाच्या भिंतीवर वारली पेंटिंगद्वारे स्वच्छतेचा संदेश देणारी चित्रे काढली. त्यांनी मुलांसाठी कागद, रंगाचे साहित्य आणले होते. पन्नास ते साठ विद्यार्थ्यांनी या वेळी स्वच्छतेवर चित्रे काढली.

देशभक्तीपर गीतांमुळे जोश
उद्यानात देशभक्तीपर गीते वाजवली जात होती. त्यामुळे स्वच्छता करणाऱ्यांच्या उत्साहात आणखी जोश भरला जात होता. भारत मातेचा जयघोष आणि स्वच्छतेबाबतच्या सूचना यामुळे वेगळेच वातावरण तयार झाले होते.