आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केणेकर-आयुक्तांतील वादाचा चेंडू मंत्री दानवे यांच्या कोर्टात!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजपचे गटनेते संजय केणेकर आणि मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांच्यातील वाद केंद्रीय ग्राहक संरक्षणमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कोर्टात गेला आहे. उपमहापौर संजय जोशी यांनी दानवे यांची शनिवारी भेट घेऊन घडला प्रकार त्यांच्या कानी टाकला आहे. नियोजित दौरा आटोपून प्रकरणावर तोडगा काढणार असल्याचे दानवे यांनी जोशी यांना सांगितले.

नियोजित दौऱ्यानुसार दानवे शनिवारी शहरात आले होते. त्यांची जोशी यांनी भेट घेऊन सर्व घटनाक्रम सांगितला. केणेकर हे भाजपचे गटनेते असून पक्षाच्या वतीने महाजन यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आल्याचेही त्यांना सांगण्यात आले. आयुक्त महाजन यांची मनपात काम करण्याची इच्छा आहे किंवा नाही, कशा पद्धतीने काम करू शकतात, याबाबत महाजन यांच्याशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करू, असे दानवे यांनी सांगितले.

हा तर चुकीचा प्रकार
आयुक्त महाजन यांनी केणेकर यांना दिलेल्या धमकी प्रकरणाची शनिवारी दिवसभर मनपा वर्तुळात चर्चा होती. शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल सायंकाळी मनपात आले होते. आयुक्तांचे वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी, छायाचित्रकारांना बोलणे चुकीचे आहे, असे स्पष्ट करून आयुक्तांनी लोकप्रतिनिधींशी वाद घालत बसू नये. प्रतिनिधींनीही समन्वयाने कामे करून विकास करावा. याबाबत आयुक्तांना भेटून चर्चा करू, असे जैस्वाल यांनी सांगितले.

भाजपला वगळून सेनेची आयुक्तांशी चर्चा : मनपात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेनेत गेल्या दोन महिन्यांपासून लहानसहान बाबींवरून राजकारण होत आहे. एका शब्दात समांतरला होकार देणाऱ्या भाजपने आता निवडणुका जवळ येताच समांतरला विरोध सुरू केला आहे. शिवसेनेने घेतलेल्या ठरावांनाही भाजप नगरसेवकांकडून विरोध होत आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवकांकडून प्रशासन आणि महापौरांना कोंडीत पकडण्यात येत होते. त्यामुळे आता शिवसेनेनेही कंबर कसली आहे.
शनिवारी सकाळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केल्यानंतर ओझा यांनी महाजन यांना बोलावून सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह दालनात विशेष बैठक घेतली. यात भाजपचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. यात महाजन यांना जवळ करून जास्तीत जास्त कामे करून घेत भाजपला शह देण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा मनपात होती. बैठकीला स्थायीचे सभापती विजय वाघचौरे, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, गटनेते मीर हिदायत अली, बबन नरवडे, अनिल जैस्वाल यांची उपस्थिती होती.

केणेकरांकडून तक्रार मागे नाही
संजय केणेकर यांनी आयुक्तांविरुद्ध पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेतली नाही. याबाबत प्रशासनाकडूनही काहीच हालचाली करण्यात आल्या नाहीत. सकाळपासून महाजन यांच्यासह भाजप आणि सेनेच्या वतीने चर्चा सुरू होती. यात तक्रार मागे घेण्याबाबत आयुक्तही काही बोलले नाहीत, तर केणेकर यांनीही तक्रार मागे घेतली नाही.

महापौरांकडून बैठकीचा इन्कार
सकाळी विशेष बैठक झाली नाही. मात्र, आयुक्त व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली असे महापौर ओझा यांनी सांगितले. प्रशासनाच्या वतीने बैठक पार पडल्याचे पत्रक काढण्यात आले. पुंडलिकनगर, गजानन महाराज मंदिर, सेव्हन हिल्स परिसरात गर्दी होते. त्यामुळे सिडको बसस्थानकाकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता करण्याबाबत विचार करा. अतिक्रमणांमुळे अपघात वाढल्याने हे अतिक्रमण काढण्याचेही आदेशही महापौर ओझा यांनी बैठकीत दिले.

भाजपकडून आयुक्तांशी चर्चा
संध्याकाळी उपमहापौर संजय जोशी यांनी भाजपच्या काही नगरसेवकांसह महाजन यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यात आपण विकासकामे करत नसल्याने असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे आपण विकासकामे करावीत, अशा सूचना आयुक्तांना करण्यात आल्याचे जोशी यांनी सांगितले. कामांसाठी नगदी पैसे द्यावे लागत नाहीत. तोपर्यंत मनपाला निधी उपलब्ध होणार असल्याचेही जोशी यांनी सांगितले. महापौरांनी मला बैठकीला का बोलावले नाही. मी पदाधिकारी नाही का, असा सवाल जोशी यांनी केला.

तक्रारीवर सोमवारी निर्णय
दोन दिवसांपासून मनपात अधिकारी-कर्मचाऱ्यांतील वाद चर्चेचा विषय बनला आहे. शिवाजी झनझन हे रात्री उशिरापर्यंत बैठक बोलावत असून त्याचा त्रास होत असल्याची तक्रार दोन महिला अधिकाऱ्यांनी आयुक्त महाजन यांच्याकडे केली होती.
तसेच महाजन यांनी हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची तक्रार केणेकर यांनी पोलिसांत केली आहे. या दोन्ही तक्रारींबाबत सोमवारी निर्णय होणार आहे. महापौर कला ओझा सोमवारी या महिलांना बोलावून त्यावर निर्णय घेणार आहेत. त्याचबरोबर उपमहापौर संजय जोशी यांच्याशी चर्चा करून समांतरबाबत चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.