आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्षात एकदा तरी खादीची खरेदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधी काळी खादी वापरणे हे प्रतिष्ठेचे समजले जायचे. आता त्याचे प्रमाण कमी होत आहे. राजकारण्यांशीच खादीचा संबंध असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक फायदे असलेली खादी लोकांनी स्वीकारावी यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. एमजीएम शिक्षण संस्थेनेही यासाठी पाऊल उचलण्याचे ठरवले. वर्षात किमान एकदा तरी (गांधी जयंती) खादीचे एक वस्त्र घ्या, अशी या उपक्रमाची थीमलाइन आहे.

प्राध्यापकांचा खादी कॉस शो
एमजीएम संस्थेत दरवर्षी गांधी जयंतीनिमित्त रुक्मिणी हॉलमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सकाळी प्रभात फेरी, प्रार्थना सभा, गांधीजींच्या ४ भजनांचे गायन या कार्यक्रमानंतर दरवर्षी खादीचा फॅशन शो आयोजित केला जातो. यंदा याचे स्वरूप बदलून एमजीएमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि प्राध्यापक मंडळी खास खादीचे वस्त्र परिधान करून फॅशन शो करतील. यास ‘काॅस शो’ असे नाव देण्यात आले आहे.

शपथ घ्या...खादी घालणार
या कॉस शोनंतर उपस्थितांना खादीचा वापर करण्याची सामूहिक शपथ दिली जाणार आहे. एमजीएम कॅम्पसच्या विद्यार्थ्यांसह २५ ते ३० शाळा आणि ८ ते १० महाविद्यालयांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे, तर शहरातील अन्य शाळा, महाविद्यालये, सरकारी आणि खासगी कार्यालये अशा सर्वच ठिकाणी खादीचा वापर करण्याची शपथ घेण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. याबाबत जनजागरण करण्यासाठी जेएनईसीचे विद्यार्थी ठिकठिकाणी फ्लॅश मॉब सादर करणार आहेत. तसेच शाळा-शाळांमध्ये जाऊन या उपक्रमात सहभागी होण्याचे पत्रही देणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी शुभा महाजन यांना ०२४०-२४७०१६७ किंवा ८८८८९७८३०५ या मोबाइल क्रमांकावर केवळ एसएमएस पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बापूजींची खादी
भारत देश पारतंत्र्यात असताना ब्रिटिश भारतातून स्वस्तात सूत विकत घ्यायचे आणि इंग्लंडमध्ये त्यापासून वस्त्रे तयार केली जायची. नंतर हीच वस्त्रे भारतात महागात विकली जायची. यास गांधीजींनी विरोध केला. यातूनच स्वदेशी चळवळ उभी राहिली. परदेशी सामानाला विरोध करतानाच खादीला चालना देणे हा या चळवळीचा उद्देश होता. यातून भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, अशी गांधीजींची अपेक्षा होती. त्यानुसार त्यांनी देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी विशेषत: ग्रामीण भागात सूत कातण्याचा प्रचार केला. यामुळेच १९२० मधील स्वदेशी चळवळीत खादी एक महत्त्वाचा भाग बनला. आता मात्र उपलब्धता, दर्जा आणि किंमत यामुळे खादी लोकांपासून आणखीच दूर जात आहे. यासाठीही प्रयत्न होण्याची गरज आहे.

अशी आहे शपथ
मै अपने राष्ट्रीय वस्त्र खादी का आदर करते हुए शपथ लेता हूं / लेती हूं की मै अपने जीवनकाल में प्रतिवर्ष २ अक्तूबर के अवसर पर खादी के वस्त्र परिधार करूंगा / करूंगी. और अपने राष्ट्रीय वस्त्र की परंपरा को अपनी अगली पिढी को प्रदान करूंगा / करूंगी... जय हिंद...

खादीच का?
  • खादी हे आपले राष्ट्रीय वस्त्र आहे. याचा वापर करण्याची पुढील कारणे आहेत-
  • यातून शून्य टक्के कार्बनचे उत्सर्जन (इमिशन) होते.
  • यात कोणत्याही रसायनांचा वापर केला जात नाही. यामुळे ते पर्यावरणास पूरक आहेत.
  • खादीमुळे देशातील अनेक लोकांना रोजगार मिळतो. एक मीटर खादी तयार केल्याने ६ जणांना रोजगार उपलब्ध होतो.
  • खादी महाग असल्याची तक्रार असते; पण ती तयार करण्यासाठी लागणारी मेहनत लक्षात घेता ही किंमत योग्यच ठरते. गांधी जयंतीला खादीवर सूट मिळते.
  • पूर्वी खादीचे मोजकेच डिझाइन असायचे. आता खादीचे फॅशनेबल कपडे मिळतात. बाजारात मिळणाऱ्या ब्रँडेड कपड्यांच्या तोडीस तोड असे हे कपडे आहेत.