आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फॅशनच्या रॅम्प’वर खादीला प्रतिष्ठा; खुमासदार लावणीने जिंकली प्रेक्षकांची मने

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - देदीप्यमान रोषणाई, प्रत्येकाला थिरकायला लावेल असे संगीत आणि शेकडो प्रेक्षकांच्या साक्षीने शहरात ‘खादी’च्या प्रमोशनसाठीच्या खास फॅशन शोचा दिमाखदार सोहळा झाला.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय व महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या प्रदर्शनाचा र्शीगणेशा फॅशन शोच्या माध्यमातून करण्यात आला. शोचे उद्घाटन आमदार संजय शिरसाट आणि पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी हातमाग मंडळाचे अध्यक्ष धनंजय दलाल, उल्हास गवळी, आर. एम. परमार, सुरेखा फुफाटे, देविदास पालोदकर, विजय दिकोटे उपस्थित होते.

दिलीप खंडेराय आणि संचाने गणेश वंदनेने कार्यक्रमाची पारंपरिक सुरुवात करून दिली. यानंतर खादीची एकापेक्षा एक सरस वस्त्रप्रावरणे परिधान केलेल्या मॉडेल्सनी गांधीजींच्या आवडत्या ‘वैष्णव जन जो तेणे कहिये जे’ गीताच्या साथीने प्रवेश करत सोहळ्याची उंची दाखवली. ग्लॅमर विश्वातील तारेच जणू रॅम्पवर अवतरत होते. पहिल्या फेरीत खादीची वस्त्रे परिधान केलेले 10 पुरुष तर 10 महिला मॉडेल्स रॅम्पवॉक करून गेल्या. विद्यापीठाच्या संचाने प्रत्येक भारतीयाला अभिमान असलेल्या ‘वंदे मातरम्’ या नृत्यावर मनमोहक सादरीकरण केले. दुसर्‍या फेरीत टस्सर सिल्कचे प्रदर्शन मॉडेल्सनी केले. अतिशय दुर्गम अशा जंगलातून आदिवासी तस्सर गोळा करून आणतात. त्यापासून बनवले जाणारे तस्सर सिल्क अतिशय उच्च दर्जाचे तर आहेच, मात्र त्याच्या किमतीही अस्मानाला भिडणार्‍या आहेत. यानंतर सिनेअभिनेत्री पूजा सावंत हिने ‘राधा ही बावरी’ गीतावर थिरकत शिट्टय़ा आणि टाळ्यांचा प्रतिसाद मिळवला. ऑल इंडिया सिल्क या फेरीमध्ये देशभरातील वैविध्यपूर्ण सिल्कचे प्रदर्शन मॉडेल्सनी केले. माधुरी दळवी हिने ‘मी सातार्‍याची गुलछडी’ ही लावणी भन्नाटपणे सादर केली आणि सोहळ्याची रंगत वाढली. यानंतर कोळीनृत्य तसेच भारताची विविधता दाखवणारे राजस्थानी, तामिळी नृत्य आर के. ग्रुपने सादर केले.

शेवटी पूजाने ‘छबीदार छबी’ या लावणीने जल्लोषात सर्वांना सहभागी करून घेत उपस्थितांना अनोखी सांस्कृतिक मेजवानी दिली. शेवटची फेरी औरंगाबादची शान पैठणीने गाजवली. एकाहून एक आकर्षक रंग, जरीकाठ, खुणावणारे लावण्य यांच्या साथीने आणि शो स्टॉपर पूजा सावंत हिने सोहळा संस्मरणीय केला. सूत्रसंचालन नीता पाडळकर यांनी केले.

छायाचिऊ - प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर हातमाग न्याहाळताना पोलिस आयुक्तांसह इतर मान्यवर.